डोंबिवली पश्चिमेत तांत्रिक बिघाडामुळे गेल्या वीस दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असतानाच, आता कुंभारखाणपाडा भागातील दूरध्वनी गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याची माहिती उजेडात आली आहे. कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे शहरात सीमेंटचे रस्ते, भुयारी गटार योजना सुरू आहेत. या कामांसाठी रस्ते खोदकाम करण्यात आल्याने भूमिगत टाकण्यात आलेल्या वाहिन्यांमध्ये पाणी घुसून विजेचा व दूरध्वनी बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत, असे महावितरण व भारत संचार निगमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कुंभारखाणपाडा भागातील दूरध्वनी एक महिन्यापासून बंद असल्याने दूरध्वनी सुरू होण्यासाठी नागरिक सतत निगमच्या कार्यालयात फेऱ्या मारीत आहेत. परंतु, भूमिगत वाहिन्यांमध्ये बिघाड असल्याने तो काढताना कर्मचाऱ्यांना नाकीनऊ येत आहेत. मुसळधार पाऊस सुरू असल्याने पाणी डकमध्ये जाते. किंवा रस्ते खोदाई करताना जेसीबीचे फटके दूरध्वनी वाहिन्यांना बसले आहेत. त्या वाहिनीत पावसाचे पाणी गेले की दूरध्वनी बंद पडतो किंवा दूरध्वनीमध्ये खरखर सुरू होते, असे संचार निगमच्या अधिकाऱ्याने सांगितले. एका पालिकेने वीज, दूरध्वनी या सर्व यंत्रणेला वेठीस धरल्याने आणि पालिकेतील नगरसेवक, आयुक्तांसह सर्व अधिकारी संथगतीने सुरू असलेल्या आपल्या विकासकामांविषयी मूग गिळून असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा