नवी मुंबई पालिकेने सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च करून बेलापूर सेक्टर ५० येथे बांधलेल्या नवीन मुख्यालयात आजही अनेक उणिवा नागरिक आणि अधिकाऱ्यांना भेडसावत असून संध्याकाळी साडेपाचनंतर पाणी आणि वीज बंद होत असल्याने अधिकारी हतबल झाले आहेत. इतक्या मोठय़ा वास्तूला केवळ विद्युत पंपाने मिळणारे पाणी उपलब्ध असल्याने संध्याकाळी शौचालयात जाणे शक्य होत नाही. करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या या इमारतीतील मध्यवर्ती वातानुकूलन यंत्रणेमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आता गुडघेदेखील दुखू लागले आहेत. सर्वसामान्य नागरिकाला नजरेसमोर ठेवून न बांधण्यात आलेल्या या आलिशान वास्तूत प्रवेश करताना नागरिकांना एक प्रकारचे दडपण येत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मुंबई पालिका वगळता राज्यात इतर कोणत्याही पालिकेचे इतके आलिशान मुख्यालय नाही. असे मुख्यालय नवी मुंबई पािलकेने बेलापूर येथे बांधले आहे. या मुख्यालयाचे बांधकाम घाईघाईत केल्याने त्यात आजही अनेक उणिवा असल्याचे जाणवत आहे. नागरिकांच्या एखाद्या सोसायटीतदेखील वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर इमारतीच्या डोक्यावर असणाऱ्या पाण्याच्या टाकीतून गुरुत्वाकर्षणाने घरात पाणी उपलब्ध होत आहे, पण करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या वास्तूच्या डोक्यावर पाण्याची टाकीच नसल्याने केवळ पंपाद्वारे पाणी उपलब्ध केले जात आहे. पालिकेची वेळ संध्याकाळी साडेपाच वाजता संपत असल्याने त्या वेळी मुख्यालयाचा वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी दिले आहेत. पािलकेची अधिकृत वेळ संपल्यानंतर संध्याकाळी उशिरा थांबून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची त्यामुळे मोठी पंचाईत झाली आहे. एखाद् दुसऱ्या अधिकाऱ्यासाठी मुख्यालयातील मध्यवर्ती वातानुकूलन यंत्र सुरू ठेवता येणार नाही. त्यामुळे विद्युत बिल मोठय़ा प्रमाणात वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आयुक्तांनी हे बंदीचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांना साडेपाचनंतर एक प्रकारे मुख्यालयबंदी लागू झाली आहे. आयुक्तांना त्यांच्या फाईल्स घरी नेण्याची मुभा आणि सोय आहे पण इतर अधिकाऱ्यांनी काय करायचे, असा प्रश्न पडला आहे. दालनात दिवसभर निर्माण होणारा गारवा व आलिशान तावदानातून येणाऱ्या संधिप्रकाशाच्या जोरावर काही अधिकारी साडेपाचनंतर एक-दोन तास राहण्याचा प्रयत्न करीत आहेत पण या काळात शौचालयात जाऊन शौच किंवा लघुशंका करणे शक्य नाही. विद्युतपुरवठा खंडीत होत असल्याने शौचालयात पाणी उपलब्ध होण्याची कोणतीच सोय नाही. त्यात शौचालयात विजेअभावी मिठ्ठ काळोख पसरल्याचे दिसून येते. सरकारी कार्यालये ही सर्वसामान्य गरीब करदात्यांना नजरेसमोर ठेवून बनवावीत, असा शासनाचा नियम आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यालय तेथील सुविधा यांचे निकष निश्चित करण्यात आले आहेत. गरिबातील गरीबदेखील या कार्यालयामध्ये येताना त्याच्या मनावर कोणतेही दडपण असणार नाही, अशी यामागची धारणा आहे, पण पालिकेच्या नवीन मुख्यालयात पालिका क्षेत्रातील एखादा आदिवासी किंवा झोपडपट्टीतील गरीब जाण्यास धजावणार नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. त्यात आठ तास मध्यवर्ती वातानुकूलन यंत्र सुरू असल्याने आता वय झालेल्या काही अधिकाऱ्यांचे गुडघे दुखू लागले आहेत. ही यंत्रणा बंद करण्याचे त्यांच्या हातात नसल्याने मोठी पंचाईत झाली आहे. दोनशे कोटी रुपयांच्या या इमारतीतील काही दालनांचे काम अद्याप बाकी असून अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय पत्तीवार यांच्या दालनातील एका भिंतीवरील कपाट सोमवारी खाली कोसळले. त्यामुळे या इमारतीतील बांधकाम किती तकलादू आहे याचा प्रत्यय येत आहे. आलिशान मुख्यालयातील कामकाज पेपरलेस करण्याचा खूप प्रयत्न केला जात आहे पण मळलेले, काळपटलेले फाइल्सचे गठ्ठे आजही या इमारतीत इतरत्र पडलेले दिसत असल्याने इमारत पंचतारांकित पण टेबलावरील फाइल्स मात्र घाणेरडय़ा असे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहे. हे सर्व कमी म्हणून की काय सर्वसामान्यांच्या पैशातून उभारण्यात आलेल्या या वास्तूत प्रवेश करताना त्यांनाच प्रवेशद्वाराबाहेर ठेवण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे. नागरिकांना संध्याकाळी तीन ते पाच याच वेळेत प्रवेश दिला जाणार आहे. त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा