कल्याण, डोंबिवली शहरांमध्ये महावितरण तसेच दूरसंचार कंपन्यांनी आपल्या वाहिन्या टाकण्यासाठी जागोजागी खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण झाले असून महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हे चर भरण्याची कामे अजूनही प्रलंबित राहिली आहेत. पावसाळ्यापूर्वी हे खड्डे भरले जावेत, अशी अपेक्षा एकीकडे व्यक्त होत असताना दुसरीकडे नव्याने खड्डे खोदून वाहिन्या टाकण्याची कामे वेगाने सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

मागील वर्षभरापासून महावितरण, बीएसएनएल, रिलायन्स, व्होडाफोन अशा कंपन्यांकडून शहरात भूमिगत वाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. ही खोदकामे करण्यासाठी काही कोटी रुपयांचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे. या कंपन्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने ठेकेदाराकडून चर तसेच खड्डे भरण्याची कामे तातडीने करून घेणे आवश्यक असते. ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावीत म्हणून स्थायी समितीने सुमारे दहा कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी दिली आहे.
प्रशासनाने ठेकेदार नियुक्त करून या कामाचे आदेश देणे आवश्यक आहे. मात्र, ठेकेदारांना अद्याप कामाचे आदेश मिळाले नसल्याने चर भरण्याची कामे रखडली आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करणे आवश्यक असताना वाहिन्या टाकण्यासाठी नव्याने खड्डे खणले जात आहेत. ही कामे पूर्ण होत नसल्याने सर्वत्र मातीचे ढीग साचले असून धुरळा उडताना दिसत आहे.