दोषाचे खापर कंत्राटदारावर
उन्हाळ्यामध्ये शहरातील विविध भागात पाण्याची निर्माण होणारी टंचाई बघता पेंच ४ चे मोठय़ा थाटात उद्घाटन करण्यात आले. या प्रकल्पामुळे येत्या आठ दिवसांत शहरात ११५ दशलक्ष लिटर्स (एमएलडी) पाणी पुरवठा जास्त मिळणार असल्याची घोषणा करण्यात आल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, कंत्राटदारांच्या चुकीमुळे आता जादा पाण्यासाठी नागरिकांना आणखी चार ते पाच महिने वाट पाहावी लागणार असल्याची माहिती मिळाली.
केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान योजनेच्या माध्यमातून पेंच टप्पा ४ ची निर्मिती झाली. योजनीची बरेचशी कामे अर्धवट आहेत. यासाठी पुरेसा निधी न मिळाल्याने कामे बंद होती. हा प्रकल्प अनेक तांत्रिक अडचणीमुळे रखडला असताना सत्तापक्षाने रामनवमीच्या दिवशी केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे उद्घाटन केले. उद्घाटन कार्यक्रमात सर्वच नेत्यांनी या उन्हाळ्यामध्ये शहरात ११५ दशलक्ष लिटर्स जादा पुरवठा होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. गेल्या अनेक वर्षांपासून गोधनी भागात पाण्याचा तुटवडा असल्यामुळे त्या भागात पेंच ४ मधून पाणी पुरवठा होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र त्या ठिकाणी पाणी देण्यास काही अडचणी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पेंच ४ मधून उत्तर, पूर्व आणि मध्य नागपूरमध्ये पाणी पुरवठा केला जाणार होता. त्यांना किमान चार महिने वाट पाहावी लागणार आहे. शहरात सध्या ६४६ दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होत आहे. पेंच ४ प्रकल्पामुळे त्यात ११५ दशलक्ष लिटर्सची भर पडणार होती. कालव्यातील गळतीचे पाणी उपलब्ध झाल्याने महापलिकेची १० ते १५ कोटींची बचत या प्रकल्पामुळे होणार असल्याचे सांगितले होते. शहराला सध्या पेंच टप्पा १ मधून १४० दशलक्ष लिटर्स, २ मधून १४० दशलक्ष लिटर्स, ३ मधून १३० दशलक्ष लिटर्स, गोरेवाडामधून १६ दशलक्ष लिटर्स आणि कन्हानमधून २२० दशलक्ष लिटर्स असा ६४६ दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होतो. त्यात पेंच टप्पा ४ मधून अतिरिक्त म्हणजे ११५ दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा होणार होता. मात्र तो सध्या तरी शक्य नसल्याचे जलप्रदाय विभागाकडून सांगण्यात आले. पेंच नदीवरील तोतलाडोह व नवेगाव खैरी येथील जलाशय पाण्याचे मुख्य स्त्रोत आहे. या दोन्ही जलाशयात १२७० द.ल.घ.मी. पाणी साठा आहे. पेंच ४ प्रकल्पामुळे कालव्यातील पाण्याच्या गळतीचे प्रमाण कमी होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा