केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत शहरात बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेतर्फे मुंबई महानगर प्रदेश विभाग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. प्राधिकरणाकडून हा प्रस्ताव पुढे केंद्र शासनाकडे पाठविला जाणार असून, प्रस्ताव एकदाचा मार्गी लागल्याने शहर बससेवेचे धुळेकरांचे स्वप्न लवकरच साकार होऊ शकेल.
केंद्राच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत महापालिकांना अनुदान व शहर बससेवा सुरू करण्यासाठी गाडय़ा उपलब्ध करून देऊन प्रोत्साहन देण्यात येते. या योजनेंतर्गत राज्यातील मोठय़ा महापालिकेच्या क्षेत्रांत बससेवा सुरू आहे. आता लहान महापालिका क्षेत्रातही ही योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्या अनुषंगाने या योजनेंतर्गत बससेवा सुरू करण्यासाठी धुळे महापालिकेलाही प्रस्ताव मिळाला आहे. महापालिका निवडणुकीची आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु होण्यापूर्वी झालेल्या स्थायी समिती सभेत या प्रस्तावाला मंजुरीही देण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनातर्फे मुंबई महानगर प्रदेश विभाग प्राधीकरण विभागाकडे शहर बससेवेचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव पुढे केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
केंद्र शासनाच्या या योजनेंतर्गत महापालिकेला २५ गाडय़ा दिल्या जाणार आहेत. तसेच आगार उभारण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधीही दिला जाईल. शहर बससेवेसाठी महापालिकेने सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर तसेच बस मिळाल्यावर त्या चालविण्यासाठी ठेका देण्यात येणार आहे. आगाराच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च करून महापालिकेला हक्कनामा द्यावा लागणार आहे. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहर बससेवा सुरू करणे आवश्यक झाले आहे. गेल्या वर्षी महापालिकेने ही सेवा सुरू करण्यासाठी खासगी ठेकाही दिला होता. तो चुकीच्या पद्धतीने दिल्याने रद्द करण्यात आला होता. त्यामुळे या योजनेतून बससेवा लवकर सुरू होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.