शहर काँग्रेसचे सरचिटणीस, महापालिकेच्या स्थायी समितीचे तसेच शहर सुधारणा समितीचे माजी अध्यक्ष अरुण हिरामण धिमधिमे (वय ५१) यांचे शुक्रवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. धिमधिमे यांच्यावर रात्री वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले.
पुणे महापालिकेवर १९९२, ९७ आणि २००७ साली धिमधिमे दत्तवाडी परिसरातून निवडून गेले होते. नगरसेवकपदाच्या पंधरा वर्षांच्या कारकिर्दीत त्यांना स्थायी समिती आणि शहर सुधारणा समितीचे अध्यक्षपद भूषविण्याचीही संधी मिळाली. खडकवासला ते पर्वती दरम्यान जलवाहिनी टाकून त्याद्वारे पाणी आणण्याची योजना त्यांच्या कल्पनेतून साकारली होती. शहराच्या विकास आराखडय़ासंबंधीही त्यांचा विशेष अभ्यास होता. शहराच्या भवितव्याचा विचार करून चांगला आराखडा तयार करण्याचा प्रयत्न त्यांनी गेल्या वर्षी शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष असताना केला. तसेच जुन्या शहरासाठी काही चांगले प्रकल्पही प्रस्तावित केले.
धिमधिमे यांचा स्वभाव मनमिळाऊ होता, तसेच अभ्यासूवृत्तीने काम करण्यासाठीही त्यांची ख्याती होती. ते उत्तम व अभ्यासू वक्तेही होते. काँग्रेस कार्यकारिणीतील अनेक पदांवर त्यांनी काम केले होते. झोपडपट्टीवासियांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने काम केले आणि विविध योजनाही यशस्वी केल्या. सिंहगड रस्त्याचे रुंदीकरण, पु. ल. देशपांडे उद्यानाची निर्मिती ही त्यांची कामे लक्षणीय ठरली. त्यांच्यावर रात्री वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. महापालिकेतील अनेक पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
उद्या काँग्रेसतर्फे सभा
धिमधिमे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवारी सकाळी अकरा वाजता काँग्रेस भवन येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा