रस्ते दुरुस्ती, जलवाहिनी, मलवाहिन्या टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आल्याने विविध भागातील केबल मोठय़ा प्रमाणात खराब झाल्या असून पथदिवे दुरुस्ती योग्य प्रकारे होत नसल्याने शहरातील अनेक वस्त्यांमध्ये काळोख पसरलेला आहे. या संदर्भात नागरिकांनी तक्रारी करूनही समस्या जैसे थे असल्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. पावसाळ्याच्या पूर्वी शहरातील विविध क्षागात रस्ते दुरस्तीचे काम करण्यात आले आहे. या शिवाय ओसीडब्ल्यूतर्फे जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले असून त्या काळात अनेक ठिकाणी केबल खराब झाल्यामुळे  ते दुरस्त करण्यात आले नाही. शहरात पश्चिम , पूर्व आणि उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये ही समस्या आहे. या संदर्भात नगरसेवक आणि नागरिकांनी महापालिकेचे कार्यकारी अभियंता (विद्युत) यांच्याकडे अनेकदा तक्रार करूनही ‘प्रकाश’ पडलेला नाही.
पावसाळ्याच्या दिवसात अनेक झोपडपट्टी भागात पाण्याचे डबके साचले आहेत त्यामुळे रस्त्यावरील पथ दिवे बंद असल्यामुळे नागरिकांना त्या भागातून जाणे कठीण झाले आहे. उत्तर नागपुरातील पिवळी नदी, नारा, संजय गांधी नगर या वस्त्यांमध्ये रस्त्यावरील पथदिवे गेल्या दोन महिन्यापासून बंद असल्याचे वस्तीतील नागरिकांनी सांगितले. शहरातील पथदिवे देखभाल दुरुस्ती कंत्राटादारामार्फत करण्यात येते. प्रत्येक झोनमध्ये एक कंत्राटदार असतो. रोजंदारीच्या कामगार ठेवून कंत्राट पथदिवे दुरुस्तीचे काम करते. महापालिका निविदा काढून देखभाल दुरुस्तीसाठी साहित्य खरेदी करते आणि कंत्राटदाराला ते पुरविण्यात येते. पथदिवे दुरुस्तीवर दरवर्षी १० ते १२ कोटी रुपयांचे महापालिकेचे बजेट आहे. मात्र, रस्त्यावरील रात्रीचा काळोख काही दूर होत नाही. शहरात साधारणत: १ लाखाच्या जवळपास विजेचे खांब असून तेवढेच पथदिवे आहेत. यातील ४ ते ५ टक्के पथदिवे देखभाल दुरुस्तीसाठी बंद असतात. विशेषत: रिंग रोडवरील पथदिवे केबल खराब झाल्यामुळे बंद आहेत.
रस्ता दुभाजकावरील तसेच, वस्त्यांतील अंर्तगत खांबावरील दिवे विशिष्ट अंतराने बंद असतात. यासंदर्भात तक्रारी केल्यावर तक्रारीकडे दुर्लक्ष केले जाते आणि नगरसेवकाने हस्तक्षेप केल्यानंतर दुरुस्ती झालीच तर फार तर काही दिवसात परत पथदिवे बंद पडून अंधार होतो. प्रत्येक दहा पथदिव्यांमागे तीन दिवे बंद पडलेल्याचे चित्र शहरात सर्वत्र सारखेच आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार गेल्या कित्येक वर्षांपासून पथदिवे दुरुस्तीचे कंत्राट एकाच कंत्राटादाराला दिले जात आहे. या कंत्राटदाराला महापालिका हॅड्रोलिक मशिन, टयूबलाईट, चोक, सॉकेट उपलब्ध करून देते. या कंत्राटदाराला केवळ दुरुस्तीसाठी वर्षांला एक ते सव्वा कोटी रुपये दिले जाते. साधारणत: दुरुस्तीसाठी कंत्राटदार कित्येक दिवस वेळ मारून नेतो. कंत्राट आणि दोन चार लोकांची ‘गँग’ सर्वसामान्य नागरिकांना दाद देण्याचे काहीच कारण नसते. अत्यंत मनमानी पद्धतीने कंत्राटदाराचा कारभार सुरू असतो. मात्र, कंत्राटदाराबाबत कनिष्ठ अभियंत्यांना काहीच तक्रार नसते,
हे विशेष.
आढावा घेणार
शहरात जलवाहिन्या, मलवाहिन्या तसेच रस्ते दुरस्तीसाठी खोदकाम करण्यात आल्याने अनेक भागातील केबल खराब झाल्याने पथदिवे बंद असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. झोन पातळीवर पथदिवे दुरस्तीसाठी विद्युत विभाग काम करीत असून ते आढावा घेत असतात. काही वस्त्यांमध्ये पथदिवे दुरस्तीचे काम सुरू असून काही ठिकाणी केबल बदलविण्याचे काम सुरू आहे. मात्र या या संदर्भात पुढच्या आठवडय़ात विद्युत विभागाची बैठक घेऊन त्यात पथदिव्यांचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी दिली.

Story img Loader