शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सीटी स्कॅन मशीन गेल्या २५ दिवसांपासून बंद असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. याबद्दल अनेक रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी मेडिकल प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतरही प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही.
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात केवळ विदर्भातून नाही तर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधून मोठय़ा प्रमाणात गोरगरीब नागरिक उपचारासाठी येत असतात. रुग्णालयात आल्यानंतर उपचाराच्या दृष्टीने सर्व सोयीसुविधा रुग्णांना मिळणे अपेक्षित असताना रुग्णालयातील सीटी स्कॅन, एक्सरे मशीन बंद असल्यामुळे त्यांना बाहेर जाऊन तपासणी करावी लागत आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या पंचवीस दिवसांपासून सी टी स्कॅन मशीन बंद असल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे. वर्षभरात आता पर्यंत पाच वेळा ही मशीन बंद झाली असून वारंवार त्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च केले जातात. गेल्या वर्षभरात या मशीनवर ५० लाख रुपये दुरस्तीसाठी खर्च करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे, मात्र अधिकृत त्यावर कोणीही बोलायला तयार नाही. पंतप्रधान स्वास्थ्य योजनेंतर्गत केंद्र सरकारने दिलेल्या निधीतून नवीन सीटी स्कॅन मशीन खरेदी करण्यात आली आहे. ती मशीन येऊन आता सहा महिन्यांचा कालावधी झाला मात्रअजूनही ती काही तांत्रिक कारणामुळे सुरू करण्यात आली नाही.
जुन्या सीटी स्कॅन मशीनचा उपयोग काही डॉक्टर खाजगी कामासाठी करतात की काय, अशी शंका यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी मेयो हॉस्पिटमधीलमधील सीटी स्कॅनची मशीन खराब झाली होती, त्यामुळे मेडिकलच्या सीटी  स्कॅन मशीनवर जास्त भार येत होता, मात्र मेयोमधील मशीन दुरुस्त करण्यात आल्यानंतर मेडिकलमधील मशीन बंद झाली आहे. या मशीनची देखभाल करण्यासाठी विमा योजना करण्यात आली आहे मात्र त्याचा उपयोग का केला जात नाही, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. वासुदेव बारसागडे यांनी सांगितले, रुग्णालयात असलेल्या जुनी सीटी स्कॅन मशीन दुरुस्त करण्यासाठी १५ ते २० लाख रुपये खर्च अपेक्षित असून वैद्यकीय संचालनालयाकडे तसा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. सहा महिन्यांपासून त्याचा पाठपुरावा केला जात आहे. नवीन सीटी स्कॅन मशीन लावण्यात आली आहे, मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे बंद आहे. येत्या आठवडय़ात ती सुरू करण्यात येईल, असेही डॉ. बारसागडे यांनी सांगितले.

Story img Loader