माथेफिरू तरुणाने एका तरुणीच्या घरात शिरून तिच्या वडिलांवर गोळी झाडून, तसेच भोसकून निर्घृण हत्या केली. तिच्या आईला भोसकल्याने ती गंभीर जखमी असून रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. अंगाचा थरकाप उडवून देणारी ही फिल्मी स्टाईल घटना मानेवाडा मार्गावरील श्रीनगरात बुधवारी पहाटे घडली.
योगेश दादाजी डाखोळे हे मरण पावलेल्यांचे नाव असून ते शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कार्यालयीन अधीक्षक होते. काल रात्री ते, त्यांची पत्नी कुसुम व मुलीसह घरी झोपले होते. पहाटे अडीच वाजताच्या सुमारास त्यांच्या घराजवळ राहणारा आरोपी अन्वरखान त्यांच्या शयनकक्षात शिरला. त्याने हातातील देशी कट्टय़ातून योगेश यांच्या दिशेने गोळी झाडली. त्या आवाजाने योगेश जागे झाले, मात्र त्यांच्या डोक्याला गोळी लागली. त्यांनी त्या स्थितीतही अन्वरशी झटापट केली. अन्वरने तीक्ष्ण व धारदार चाकूने योगेश यांच्यावर सपासप वार केले. त्यात योगेश यांचा जागीच मृत्यू झाला.
या आवाजाने पत्नी कुसुम व मुलगी दोघीही उठल्या. कुसुम अन्वरकडे झेपावल्या. ते पाहून अन्वरने कुसुमच्या दिशेने गोळी झाडली, मात्र गोळी कट्टय़ातच अडकली. कुसुम त्याच्याशी झटापट करू लागल्या. ते पाहून अन्वरने चाकूने त्यांनाही भोसकले. त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. तेवढय़ा वेळेत धाडस दाखवून तरुणीने शयनकक्षाचे दार बंद करून ती न्हाणीघरात पळाली आणि तिने मोबाईलवरून पोलिसांना कळविले. तोवर अन्वरने शयनकक्षाचे व न्हाणीघराचे दार धक्का मारून तोडले. चाकूच्या धाक दाखवून युवतीला घेऊन तो इमारतीच्या गच्चीवर गेला.
या घटनेची सूचना मिळताच मानेवाडा चौकात गस्त घालत असलेले सहायक पोलीस निरीक्षक विजय आकोत, उपनिरीक्षक जाधव सहकाऱ्यांसह यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत घटनास्थळी शेजारचे लोक गोळा झाले होते. आरोपी अन्वर घराच्या गच्चीवर युवतीच्या पोटाला चाकू रुतवून उभा होता. लोक त्याला ‘तिला सोडून खाली ये’ म्हणत होते. ‘दोनोको टपकाया इसको और उपर आनोवालोको टपकाऊंगा’ अशी जोरात ओरडून धमकी देत होता. त्याला पाच-दहा मिनिटे लोकांनी बोलण्यात गुंतवून ठेवले. तेवढय़ा वेळेत गंभीर जखमी कुसुमला पोलिसांनी इतर नागरिकांच्या मदतीने लगेचच जवळच्या आपुलकी (वैरागडे) रुग्णालयात दाखल केले. सहायक पोलीस निरीक्षक विजय आकोत, उपनिरीक्षक जाधव, तसेच अन्वर रहात होता, त्या घर मालकाच्या मुलाला घेऊन हळूहळू पायऱ्याने गच्चीवर गेले. या तिघांनी ‘ये क्या कर रहा है तू’ असे म्हणत अन्वरला पकडले.
तोपर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव वांढरे, सुरेश शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक विनोद दिघोरे यांच्यासह हुडकेश्वर व नंदनवन पोलीस ठाण्याचा ताफा तेथे आला. रात्री शहरात गस्त घालणारे पोलीस उपायुक्त संजय दराडे तेथे पोहोचले. अतिरिक्त पोलीस आयुक्त अनंत शिंदे यांनीही घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी आरोपी अन्वरखान याला लगेचच पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले. या घटनेत किरकोळ जखमी युवतीवर उपचार करण्यात आले. घाबरलेल्या युवतीला पोलिसांनी दिलासा दिला. तिने दिलेली माहिती व घटनास्थळाची स्थिती पहिल्यानंतर पोलिसांच्याही अंगावर काटा आला. आरोपी अन्वरखान याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला आठ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
योगेश डाखोळे यांच्या पार्थिवावर सायंकाळी मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
तो स्वत:लाही संपवणार होता..
डाखोळे कुटुंबाने बोलणे बंद केल्याने त्यांना ठार करून स्वत:लाही संपवून घेण्याचे ठरविले होते, असे आरोपी अन्वरने पोलिसांना सांगितले. देशी कट्टा कुठून आणला, हे सांगण्याचे मात्र त्याने टाळले.
मानेवाडा मार्गावरील श्रीनगरात योगेश डाखोळे यांचे घर आहे. त्यांना दोन मुले असून ते दोघेही बाहेरगावी नोकरी करतात. अश्विनी रायसोनी महाविद्यालयात एम.टेक.ला शिकत आहे. डाखोळे यांच्या घराच्या रांगेत ४-५ घरे सोडून अन्वर सात-आठ वर्षांपासून भाडय़ाने राहतो. तो भगवान नगरातील एका गॅरेजमध्ये वाहन दुरुस्ती करतो. त्याचे आई-वडील उत्तर प्रदेशात राहतात. त्याचा जावई सिल्लेवाडा येथे राहातो. अश्विनीवर प्रेम होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. अश्विनीने त्यास नकार दिला. तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. तिने प्रतिसाद देणेही बंद केल्याने तो संतापला. तो तिला धमक्या देत होता. त्याच्या अशा वागण्याने त्याला गल्लीतील लोकांनी चोप देऊन तिच्या वाटेस न जाण्याचा दमही दिला होता.
तरीही त्याने वागणे न सोडल्याने त्याच्याविरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी याप्रकरणी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून कडक शब्दात समज दिली होती. अश्विनी प्रतिसाद देत नसल्याने संतापलेला अन्वर आज पहाटे एका बांधकाम सुरू असलेल्या घरावर गेला. तेथून शिडीच्या सहाय्याने डाखोळे यांच्या इमारतीच्या गच्चीवर गेला. तेथील दाराचे कुलूप तोडून तो आत शिरला आणि निर्दयतेने योगेश डाखोळे यांना ठार मारले. या घटनेने त्या परिसरात खळबळ उडाली.
सकाळपर्यंत तेथे गर्दी झाली होती. अश्विनीचा एक भाऊ सकाळी नागपूरला आला. त्यांचे नातेवाईकही आले. योगेश डाखोळे यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण करून स्वकष्टाने घर बांधले. वास्तूपूजन होऊन महिनाही झाला नव्हता. त्यातच ही घटना घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा