कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ‘मार्जार’ प्रजातीतील निशाचर प्राणी मसन्याऊदचे (सिव्हेट कॅट) प्राण वाचविण्यात वाईल्डसीईआर संस्थेचे डॉ. बहार बावीस्कर यांना यश आले आहे. अलीकडच्या काळात दुर्मीळ होत चाललेला मसन्याऊद नागपुरच्या सिव्हिल लाईन्स परिसरातील सरकारी छापखान्याच्या आवारात जखमी अवस्थेत पडून असल्याचे तेथील एका जागरूक कर्मचाऱ्याने वाईल्डसीईआर संस्थेला कळविले. कुत्र्याच्या हल्ल्यातून स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात हा मसन्याऊद गंभीर जखमी झाला असून त्याच्या शरीरारवर लचके तोडल्याच्या आणि नखांनी ओरबाडल्याच्या जखमा आहेत.
त्याला तशाच अवस्थेत उचलून डॉ. बहार बावीस्कर आणि डॉ. प्रिया बावीस्कर यांनी फ्रेण्डस कॉलनीतील पशुचिकित्सा क्लिनिकमध्ये उपचारासाठी नेले. त्याच्या दोन्ही पायांच्या मांडय़ांना जखमा असल्याने तो चालू शकत नाही. त्याच्यावर तातडीने औषधोपचार सुरू करण्यात आले असून त्याची प्रकृती ठीक होत असल्याचे डॉ. बावीस्कर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. पूर्णपणे बरा होण्यास किमान महिनाभराचा कालावधी लागणार असून त्यानंतर त्याला वन विभागाच्या स्वाधीन करण्यात येईल. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
 ‘मार्जार’ कुळातील मसन्याऊद हा रात्रीच्या वेळी संचार करणारा निशाचर असून तो मांजराप्रमाणे दिसत असला तरी त्याच्या शरीराची ठेवण आणि शिकार करण्याची पद्धत भिन्न आहे. जंगल किंवा शहरातील दाट झाडीच्या परिसरात तो झाडाची ढोली किंवा खोल खड्डय़ामध्ये राहतो. हा अत्यंत भित्रा आणि बुजरा प्राणी असून स्वत:ला मानवी वस्तीपासून दूर ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असतो. पाणी आणि भक्ष्याच्या शोधात तो सिव्हिल लाईन्स परिसरातील झाडीत शिरला असताना कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला असावा, अशी माहिती डॉ. बावीस्कर यांनी दिली. उंदीर, घुशी त्याचे मुख्य भक्ष्य असून आणि मिळाल्यास मांसाचे तुकडे खाऊन तो जगतो. अलीकडच्या काही वर्षांत विदर्भातून मसन्याऊदचे अस्तित्व जवळजवळ नाहीसे झाले आहे. पूर्वीच्या काळी भंडारा जिल्ह्य़ातील ऊस उत्पादक शेतक ऱ्यांच्या  शेतात साठवून ठेवलेल्या गुळाच्या ढेल्यांवर ताव मारणारे मसन्याऊद बऱ्याचदा नजरेस पडत होते. परंतु, शहरीकरणामुळे त्यांचे दिसणेच दुर्मीळ झाले आहे. निशाचर प्राण्यांनाही भीषण पाणीटंचाईचा फटका बसत असून पाण्याच्या शोधात दिवसाउजेडी त्यांची भटकंती सुरू झाल्याचे यातून दिसून येते, असे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. प्रिया बावीस्कर यांनी सांगितले. तहानलेल्या प्राण्यांना पाणी मिळावे यासाठी लोकांनी घराबाहेर पाण्याची टाकी किंवा पक्ष्यांसाठी झाडांवर मडकी बांधून भूतदया दाखवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

Story img Loader