नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेतील एकेक वादग्रस्त प्रकरण उघडकीला येत आहे. अ.भा. तंत्रशिक्षण परिषदेची मान्यता नसलेला एम.ई. (रिसर्च) अभ्यासक्रम बेकायदेशीररित्या शिकण्याची परवानगी अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये विद्यार्थ्यांना देत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
एम.ई. (रिसर्च) या अभ्यासक्रमाला अ.भा. तंत्रशिक्षण परिषदेची (एआयसीटीई) मान्यता नसूनही विद्यापीठ त्यासाठी संलग्नता देत असल्याच्या तक्रारी मिळाल्यानंतर वरील बाब उघड झाली. ज्यांना या अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयात जावे लागत नाही किंवा परीक्षाही द्यावी लागत नाही, अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठ पदवी देते हे चुकीचे असल्याबाबत तक्रारकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. याउलट एमई / एम.टेक. च्या विद्यार्थ्यांना दोन वर्ष कालावधीच्या या अभ्यासक्रमाच्या वर्गात नियमित हजेरी लावावी लागते आणि १६ विषयांची परीक्षा द्यावी लागते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
अलीकडेच झालेल्या विद्यापीठाच्या विद्वत परिषदेच्या बैठकीत हा मुद्दा चर्चेला आला व याबाबत याला कुलसचिव अशोक गोमासे यांनी दुजोरा दिला. हा अभ्यासक्रम आणि त्याच्या समकक्ष नियमित अभ्यासक्रम याबाबतचा संभ्रम दूर करण्याची विनंती करणारे पत्र आम्ही एआयसीटीईला पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.
या संदर्भात वस्तुस्थितीची कल्पना नसल्याबद्दल, तसेच निर्णय घेण्यास विलंब लावून विद्यार्थ्यांचे भवितव्य अनिश्चित केल्याबद्दल अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता रवींद्र क्षीरसागर यांनी विद्यापीठ प्रशासनाला दोष दिला. एम.ई. (रिसर्च) हा अभ्यासक्रम गेली सुमारे तीन दशके अस्तित्वात असताना त्याला मान्यता नसल्याची जाणीव विद्यापीठाला आता झाली. या अभ्यासक्रमाच्या नावाबद्दल आक्षेप उपस्थित झाल्यानंतर आमच्या विद्याशाखेने या संदर्भात ठराव तयार केला होता. यानंतरच विद्यापीठाने एआयसीटीईचे मत घेण्याचे ठरवले असे ते म्हणाले. एम.ई. (रिसर्च) हा अभ्यासक्रम कुठल्याही महाविद्यालयातून करता येईल असा इतर नियमित अभ्यासक्रमांसारखा नाही, तर जिथे परीक्षक येतात आणि तुमची तोंडी व इतर परीक्षा घेतात अशा नियमित पीएच.डी. सारखा आहे. ही पदव्युत्तर पदवी आहे, इतका फरक सोडला तर या अभ्यासक्रमातील प्रत्येक गोष्ट अगदी पीएच.डी. सारखी आहे. याचा साधारण कालावधी दोन वर्षे असला, तरी उमेदवाराच्या संशोधनाच्या क्षमतेनुसार तो पाच वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. पीएच.डी. प्रमाणेच या विद्यार्थ्यांनाही त्यांचा शोधनिबंध लिहिण्यासाठी किमान ५० पुस्तके आणि इतर साहित्य वाचावे लागते, असेही क्षीरसागर यांनी
सांगितले.
काम करत असलेल्या ज्या अभियंत्यांना पदव्युत्तर पदवी मिळवायची आहे, त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम प्रामुख्याने तयार करण्यात आला असल्याचे सांगून विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने अधिष्ठात्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. महाविद्यालये विद्यार्थ्यांना केवळ सुविधा उपलब्ध करून देत असल्याने त्यांना यासाठी दोष दिला जाऊ नये. सुमारे तीन दशकांपूर्वीच्या अध्यादेशानुसार हा अभ्यासक्रम चालवला जातो, असे त्याने सांगितले.
अभियांत्रिकी विद्याशाखेशी संबंधित मुद्दे चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे झालेल्या गोंधळाबाबत विद्यापीठ प्रशासनावर सर्व बाजूंनी टीका होत आहे. यामुळेच अभियांत्रिकीच्या सर्व परीक्षा विनाकारण पुढे ढकलाव्या लागल्या व त्याचा ६० हजार विद्यार्थ्यांना फटका बसला. प्रामुख्याने राजकीय नेते व शिक्षण सम्राटांच्या मालकीच्या असलेल्या खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयांत बेकायदेशीररित्या प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता यावे म्हणून ९० दिवसांचा अनिवार्य अभ्यासक्रम केवळ ३० दिवसांत संपवण्यास सांगणारे कुलगुरूही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा