देशावर मुगलांनी सातशे वर्षे राज्य केले, ब्रिटीशांनी दीडशे वर्षे राज्य केले, मात्र याही काळात देशाची भाषा फार्सी किंवा इंग्रजी झाली नाही. याउलट ज्ञानोबा-तुकारामांची मराठी भाषा मात्र लोकांनी स्वीकारली, समृध्द केली, याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. भाषेवर राज्यकर्त्यांचा प्रभाव पडत नाही किंवा ते भाषा समृध्दही करू शकत नाही, ती समाजाकडूनच समृध्द होत जाईल अशी स्पष्ट कबुली गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज येथे बोलताना दिली.
दहाव्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे उदघाटन आज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री बबनराव पाचपुते, संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी लहू कानडे, स्वागताध्यक्ष राजीव राजळे, ज्येष्ठ साहित्यिक विलास गिते, महापौर शीला शिंदे, परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनशाम शेलार, माजी जिल्हाध्यक्ष दादा कळमकर, माजी नगराध्यक्ष शंकरराव घुले, माजी महापौर संग्राम जगताप आदी यावेळी उपस्थित होते.
साहित्य व्यवहाराशी संबंधित सर्व गोष्टी राजकारणी करू शकणार नाही असे सांगतानाच पाटील यांनी सरकारी साहित्य सन्मान किंवा पुरस्कारांमधील विसंगतीही मोकळेपणाने विषद केली. ते म्हणाले, शब्दगंध साहित्य चळवळीचा आदर्श इतर जिल्ह्य़ातही घेतला पाहिजे, अशा संमेलनांमधुनच माय मराठी समृध्द होईल. मराठीचा अभिमान बाळगताना अन्य भाषांचा दुस्वास करून चालणार नाही. किंबहुना अन्य भाषांमधील चांगल्या गोष्टी मराठीत अनुवादित करून त्या लोकांपर्यंत पोहचवण्यानेच मराठी भाषा अधिक समृध्द होईल.
साहित्यिकांना राजकारणाचा हेवा वाटत असावा अशी कोपरखळी पाटील यांनी मारली. ते म्हणाले, साहित्याची उत्तम जाण असणारे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनाही साहित्यापासुन तोडण्याचे प्रयत्न झाले. सरकार व राजकारण्यांकडून मदतीची अपेक्षा ठेवताना त्यांना मात्र दुर ठेवणे योग्य नव्हे.
मराठी भाषा समृध्द करण्यासाठी सर्वाना हातात हात घालून प्रयत्न करावे लागतील. मराठी साहित्य आजही सर्वसामान्यांपासुन कोसो मैल दूर आहे. या घटकाला समजेल, सामावुन घेऊ शकेल अशी साहित्यनिर्मिती जाणीपुर्वक करावी लागेल, हेच आव्हान साहित्यिकांसमोर आहे. समाजकारण व राजकारणात देशाला दिशा देणारा नगर जिल्हा याही प्रांतात राज्याला दिशा देईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
संमेलनाध्यक्ष कवी लाहू कानडे यांनी यावेळी बोलताना साहित्य, संस्कृतीच्या केंद्रस्थानी सामान्य माणुसच हवा असा आग्रह धरला. मराठी भाषा व साहित्यातील बदल टिपताना त्यांनी चातुर्वण्याला केंद्रस्थानी ठेऊन विषमतावादाला प्रोत्साहन देणाऱ्या साहित्याबद्दल नापंसती व्यक्त केली. ते म्हणाले, साहित्य हे संवादासाठीच जन्माला आले. साहित्याच्या केंद्रस्थानी सामान्य माणुस नसेल तर अराजकासारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. भारतीय राज्यघटना म्हणजेच देशाचे संविधान हेच खऱ्या अर्थाने समान्यांना जगण्याचा अधिकार देणारे पुस्तक आहे. मात्र त्याची जाणीव समान्यांना होऊ दिली जात नाही.
पालकमंत्री बबनराव पाचपुते यांचेही यावेळी भाषण झाले. सुरूवातीला स्वागताध्यक्ष राजीव राजळे यांनी उपस्थितांचे स्वागत करताना संमेलनामागचा हेतू स्पष्ट केला. संस्थेचे सचिव सुनिल गोसावी यांनी दशकपुर्तीचा आढावा घेतला. महंमद आझम, हेमंत दिवटे, संजय जोशी, राजकुमार तांगडे, महेंद्र कदम, रणधीर शिंदे यांचा विविध साहित्य पुरस्कारांनी तसेच इंद्रधनू प्रकल्पाचे राजेंद्र व सुचेता धामणे, कवयित्री चंद्रकांता आरगडे यांचा यावेळी पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रा. शंकरराव दिघे व शर्मिला गोसावी यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. भगवान राऊत यांनी आभार मानले.     
नगरकरांचा सुखद धक्का!
कार्यक्रमाला बोलावले मात्र मागितले काहीच नाही असा अनुभव क्वचितच येतो असे सांगुन आर. आर. पाटील यांनी नगरकरांनी मात्र हा सुखद धक्का दिला. या गोष्टीचा निश्चितच आनंद आहे, मात्र माझा हेतू संकुचित नाही, शब्दगंध संमेलनासाठी न मागताही कायदेशीर फंडातुन योग्य सहकार्य करील अशी ग्वाही त्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा