बहुप्रतीक्षित उजनी धरणातील पाणी उस्मानाबाद शहराला २० फेब्रुवारीपर्यंत मिळेल, असा दावा उपनगराध्यक्ष अमित शिंदे यांनी केला. परंतु या मुदतीत पाणी न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार ओम राजेनिंबाळकर यांनी दिला.
उजनी जलाशयातून उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, उपनगराध्यक्ष शिंदे यांनी दिली. गेल्या ३ दिवसांत २०० मीटर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले. केवळ ३०० मीटरचे काम बाकी आहे. जलशुद्धीकरण केंद्र व जिल्हा कारागृहासमोरील महामार्ग ओलांडण्याचे काम पूर्ण झाले आहे. टेंभुर्णी येथील राज्य महामार्गावरील काम एक दिवसात पूर्ण होणे अपेक्षित आहे. याव्यतिरिक्त अन्य तीन ठिकाणी महामार्ग ओलांडण्याचे काम शिल्लक आहे. वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. पुढील पाच दिवसांत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. पाण्याच्या उच्च दाबावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा लवकरच उपलब्ध होणार असल्याचे ठेकेदाराने कळविले आहे. त्यामुळे उजनी जलाशय ते खांडवी पंपापर्यंत १५ फेब्रुवारी रोजी जलवाहिनीची चाचणी घेण्यात येणार आहे. पुढील जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यामुळे शहराला २० तारखेपर्यंत पाणी मिळणे अपेक्षित असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पालिका निवडणुकीत तीन महिन्यांत उजनीचे पाणी आणू, असा दावा करणारे सत्ताधारी दीड वर्ष उलटले तरी पाणी देऊ शकले नाहीत. जाहीर केल्याप्रमाणे दि. २०पर्यंत शहराला उजनीचे पाणी न मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात दि. २१पासून उपोषण सुरू करण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार राजेनिंबाळकर यांनी दिला. मागील तीन दिवसांत राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनी अनेक वेळा आश्वासन दिले. परंतु योजना कार्यान्वित झाली नाही. पालिका निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन महिन्यांत पाणी येईल, असे जाहीर केले होते. त्यात काँग्रेस पक्षाने सहभागी होत ५१ कोटी मुख्यमंत्र्यांकडून मंजूर करवून घेतल्याचा दावा केला. यातील २५ कोटी उपलब्ध झाले तरी योजना रखडली आहे.