अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीची आज निवड
अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक उद्या ६ मार्चला होणार असून काँग्रेस पक्षात या पदासाठी इच्छूकांच्या स्पध्रेत सुगनचंद गुप्ता आणि राजेंद्र महल्ले हे असले, तरी सुगनचंद गुप्ता यांचे नाव आघाडीवर आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीवरून काँग्रेसमध्ये चर्वितचर्वण सुरू आहे. या पदासाठी सुगनचंद गुप्ता यांचे नाव सर्वप्रथम चर्चेला आले, पण राजेंद्र महल्ले यांनीही दावेदारी मांडल्याने काँग्रेस पक्षात दोन तट पडल्याचे दिसून आले.
आमदार रावसाहेब शेखावत यांचा निर्णय या विषयात अंतिम असेल, असे सांगण्यात आल्यानंतर दुसऱ्या गटाने माघार घेतल्याचे चित्र असून सुगनचंद गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे संकेत मिळाले आहेत. महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आहे. उभय पक्षातील सत्तावाटपाच्या करारानुसार यावेळी स्थायी समितीचे सभापतीपद काँग्रेसच्या वाटय़ाला आले आहे. १६ सदस्यीय समितीत काँग्रेसचे ५ आणि राष्ट्रवादीचे ४, असे आघाडीचे ९ सदस्य आहेत. त्यामुळे आघाडीचा उमेदवार सहजरीत्या निवडून येऊ शकेल, अशी स्थिती आहे. फुटीचा फायदा घेण्यासाठी शिवसेना उत्सूक असली, तरी ही शक्यता फार कमी आहे.
राष्ट्रवादी स्थायी समिती सभापतीपदावरील दावा सोडण्यास तयार नाही, अशी चर्चा सुरुवातीला रंगली होती. त्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती, पण सत्तावाटपाचा करार राष्ट्रवादी मोडणार नाही, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर रावसाहेब शेखावत यांच्या समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. नव्या ८ स्थायी समिती सदस्यांची निवड गेल्या महिन्यात झाली. या निवडणुकीच्या वेळीच काँग्रेसने स्थायी समितीचे सभापतीपद डोळ्यासमोर ठेवून व्यूव्हरचना केली होती. काँग्रेसमधून सुगनचंद गुप्ता यांना स्थायी समितीवर पाठवण्यात आले. किंचित दुरावलेल्या हिंदी भाषकांना खूश करण्यासाठी काँग्रेसने हे धोरण ठरवल्याची चर्चा सुरू झाली होती. आता सुगनचंद गुप्ता यांची सभापतीपदी निवड झाल्यास याविषयी पुन्हा एकदा चर्चा रंगणार आहे. बुधवारी रात्री आमदार रावसाहेब शेखावत, काँग्रेसचे शहर अध्यक्ष संजय अकर्ते, माजी महापौर विलास इंगोले, पक्षनेते बबलू शेखावत यांच्या उपस्थितीत काँग्रेसची बैठक झाली. यात स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडीचा विषय अग्रस्थानी होता.
या बैठकीत संजय महल्ले आणि सुगनचंद गुप्ता यांच्या नावावर चर्चा झाली, पण अंतिम निर्णय बुधवारी रात्री उशिरा घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader