व्यक्तिमत्त्वातील दोष कसे दूर करावेत, व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठीचे उपाय, आत्मविश्वास या सर्वाविषयी नाशिकरोड येथील चांडक बिटको महाविद्यालयात आयोजित व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
पुणे विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. डी. जी. बेलगावकर, डॉ. अंजली गौतम, विद्यार्थी सभा अध्यक्ष प्रा. के. एम. लोखंडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. समता समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश औटे यांनी आपल्यात असलेले दोष, उणिवा शोधून त्यावर मात करून व्यक्तिमत्त्वासाठी लागणारे कौशल्य आत्मसात करावे, असे आवाहन केले. व्यक्तिमत्त्वाचा उपयोग समाज व देशाच्या दृष्टीने कसा होईल याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी. पारंपरिक शिक्षणापेक्षा संशोधनपर शिक्षणास महत्त्व देऊन स्पर्धेच्या युगात आपले अस्तित्व, ठसा निर्माण करून कारकीर्द करावी असेही ते म्हणाले. कार्यशाळेत डॉ. शेखर जोशी यांनी देहबोली, डॉ. सुचिता कोचरगावकर यांनी व्यक्तिमत्त्व कसे घडवावे?  सुशुम्ना काने यांनी वेळेचे व्यवस्थापन, या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासंबंधी माहिती समन्वयक डॉ. डी. जी. बेलगावकर यांनी दिली. प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. जयंत भाभे यांनी केले. आभार प्रा. के. एम. लोखंडे यांनी मानले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Class for personality development