विद्यार्थ्यांची उपस्थिती किती आहे, प्राध्यापक शिकवण्यासाठी वर्गावर आले आहेत की नाहीत, यावर आता एका टॅबलेटच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. या टॅबलेटमध्ये सर्व माहिती साठविली जाणार असून ती थेट संस्थेच्या प्रमुखांपर्यंत पोहोचणार आहे.
माटुंगा येथील इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी)या अभिमत विद्यापीठात नव्याने सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षांत हा प्रयोग केला जाणार आहे. वर्षांच्या अखेरीस विद्यार्थ्यांची ७५ टक्के हजेरी भरली नाही म्हणून परीक्षेला बसायला दिले जात नसल्यावरून सातत्याने वाद होत असतात. ते मिटवण्यासाठी शिक्षण संस्थांनी आता अद्ययावत तंत्रसज्ज पर्याय शोधून काढले आहेत. आयसीटीमध्ये राबविल्या जाणाऱ्या या प्रयोगामध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी प्राध्यापकांनी वर्गात असलेल्या टॅबलेटवर आपल्या अंगठय़ाचा ठसा जुळवून घ्यायचा आहे. यानंतर वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या अंगठय़ाचा ठसा जुळवायचा आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वर्ग सुरू होणार. वर्ग संपल्यावर प्राध्यापकांनी पुन्हा एकदा आपल्या अंगठय़ाचा ठसा या टॅबलेटवर जुळवला की वर्ग संपल्याची नोंद होईल, अशी माहिती संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांनी दिली.
प्रत्येक तासाची माहिती ही सर्व माहिती संबंधित विभागाचे अधिष्ठाता आणि कुलगुरू यांच्या कार्यालयात जमा होईल. या माहितीमुळे कोणत्या प्राध्यापकांनी किती वर्गात शिकविले आणि विद्यार्थ्यांचे नेमके किती शैक्षणिक तास भरले, याची माहिती एकत्रित होईल, असेही ते म्हणाले.  
लेक्चर्स संकेतस्थळावर!
हजेरीच्या यंत्रणेबरोबरच वर्गात दोन कॅमेरे लावण्यात येणार असून प्रत्येक तासात होणाऱ्या व्याख्यानाचे चित्रीकरण होणार आहे. या चित्रीकरणाचे संकलन संस्थेच्या संकेस्थळावर उपलब्ध राहाणार असल्याने विद्यार्थ्यांना एखादा विषय पुन्हा ऐकायचा असल्यास अथवा हुकलेल्या तासातला पाठ ऐकायचा असल्यास ती संधी मिळणार आहे. यामुळे प्राध्यापकांच्या व्याख्यानांचा हा ऑनलाइन संग्रह ही संस्थेच्या दृष्टीनेही मोठी ठेव ठरणार आहे.

Story img Loader