ऑक्टोबर महिन्यात महात्मा गांधी जयंतीची सुट्टी असते, इतकीच काय ती बापूजींची आठवण अनेकांना होते. महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालणे हे नगरपालिकेचे कर्तव्य असल्याने दरवर्षी घालण्यात येणारे हार, त्याचप्रमाणे काँग्रेसच्या नेत्यांकडून गांधीजींची साजरी करण्यात येणारी गांधी जयंती इतकेच मर्यादित कार्यक्रम असायचे, मात्र पंतप्रधान मोदींनी गांधी जयंतीनिमित्ताने स्वच्छता अभियान राबविण्याचे देशाला आवाहन केल्याने गांधी जयंतीच्या दिवशी उरणमधील एकमेव असलेल्या गांधी पुतळ्याला झळाळी प्राप्त झाली असून दरवर्षी गांधी पुतळ्याला पडणाऱ्या एक ते दोन पुष्पहारांऐवजी या वेळी निवडणूक असल्याने पुतळ्याला घातल्या जाणाऱ्या पुष्पहारांत वाढ झाली आहे.
गांधी जयंतीनिमित्ताने देशातील प्रत्येक विभागातून स्वच्छता मोहीम राबविण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला साद देत उरणमध्ये उत्साहात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या वेळी जेएनपीटी, ओएनजीसी, भारत पेट्रोलियम, महाजनको तसेच खासगी गोदामांच्या मुख्य अधिकाऱ्यांनी स्वत: या अभियानात भाग घेतला.
या वेळी उरणमधील उरण, न्हावा शेवा तसेच मोरा सागरी पोलीस ठाण्यातही स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियानादरम्यान उरणचे साहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे यांनी पोलिसांना स्वच्छतेची शपथ दिली, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे व राजेश देवरे यांनी स्वत: कर्मचाऱ्यांसोबत पोलीस ठाणे परिसराची स्वच्छता केली. उरण परिसरातील अनेक विद्यालयांनी प्रभातफेरी काढून स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावून देण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा