केंद्र सरकारने महात्मा गांधी जयंतीपासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले असून स्वच्छतेला जन आंदोलनाचे स्वरुप आले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छ भारत अभियानाबाबत आढावा व नियोजन बैठक मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, महानगरपालिका आयुक्त दौलतखाँ पठाण, उपविभागीय अधिकारी विठ्ठल सोनवणे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.
सर्व शहरात स्वच्छता राखणे आवश्यक असून स्थानिक स्वराज्य संस्थांनी सांडपाणी व कचऱ्याचे व्यवस्थापन केले पाहिजे, असे आवाहन मिसाळ यांनी केले. प्रत्येक कार्यालय प्रमुखाने आपल्या कार्यालयाच्या प्रत्येक भागाची स्वच्छता होईल, याची दक्षता घेतली पाहिजे. यासाठी शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वाची बैठक घेऊन जनजागृती केली पाहिजे. प्रत्येक कार्यालायने आपला परिसरही स्वच्छ करण्याची मोहीम घ्यावी. अधिकाऱ्यांनी प्रथम आपल्यापासूनच स्वच्छतेची सुरूवात केली तरच ही चळवळ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, अशी सूचना त्यांनी केली.
प्रत्येक ग्रामपंचायतीकडे, नगरपालिकेकडे कचरा टाकण्यासाठी जमीन उपलब्ध आहे किंवा नाही ते पहावे. जमीन नसल्यास शासकीय जमिनीची मागणी करावी. मंगल कार्यालये, हॉटेल, दुकाने, दवाखाने यांनी त्यांच्याकडे तयार होणाऱ्या कचऱ्याची व्यवस्थित विल्हेवाट न लावल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.  अनिल लांडगे यांनी प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने आठवडय़ातून दोन तास स्वच्छतेसाठी देण्याचे आवाहन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा