ऐवजदार, सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांनी न स्वीकारल्यामुळे ऐवजदार, सफाई कामगार श्रमिक संघाच्या सदस्यांनी आयुक्ताच्या कार्यालयासमोर घोषणा देत आयुक्त आणि प्रशासनाचा निषेध केला. आयुक्त निवेदन न स्वीकारताच गेल्यामुळे संतप्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी परिसरात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्तामुळे तो यशस्वी झाला नाही. या घटनेमुळे दुपारच्यावेळी महापालिकेत काही काळ तणावाचे वातावरण होते.
महापालिकेत काम करणाऱ्या ४ हजार, ७०० कर्मचाऱ्यांना ३५० रुपये प्रमाणे मानधन देण्यात यावे, ऐवजदाराचे निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसदारांना नोकरीवर घेण्यात यावे, ईएसआयच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा मिळावी, अस्थायी सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन देण्यासाठी राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाच्या सदस्य लता महतो आणि संघटनेचे पदाधिकारी सुभाष सहारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त श्याम वर्धने यांच्याकडे गेले. मात्र, त्याचवेळी वर्धने यांना काही प्रशासकीय कामासाठी बाहेर जायचे असल्यामुळे ते निवेदन न घेता निघून गेले. यानंतर सफाई कर्मचाऱ्यांनी आयुक्त कार्यालयाासमोर घोषणा देणे सुरू केले. कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर बैठे आंदोलन सुरू केल्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसाचा ताफा येताच सफाई कर्मचारी अधिकच चिडले आणि तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्वाना बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. मात्र,  परिस्थिती निवळली. सफाई कर्मचाऱ्यांनी त्यानंतर महापालिका परिसरात निदर्शने करीत बैठे आंदोलन सुरू केले. सायंकाळपर्यंत आयुक्त कार्यालयात परतले नसल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी निषेध करीत आंदोलन संपविले. सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर महापालिका प्रशासनाने त्वरित कारवाई करून त्यांची अंमलबजावणी केली नाही तर महापालिकेतील सर्व ऐवजदार आणि सफाई कर्मचारी संपावर जातील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा