मौलवींनी पाठिंबा दिला म्हणून मुस्लिमांची, तर धर्मगुरूंनी पाठिंबा दिला म्हणून त्यांच्या अनुयायांची मोठय़ा प्रमाणात मते मिळत नाहीत, असे स्पष्ट व सडेतोड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केले. सोनिया गांधी या मौलवीच नव्हे, तर विविध धर्मगुरूंनाही भेटतात. कारण, काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. याबाबत भाजपचे वक्तव्य म्हणजे दुटप्पीपणा असल्याची टीकाही त्यांनी केली. निवडणुकीच्या निकालानंतर त्रिशंकू स्थिती निर्माण होईल व धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र होऊन आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असे भाकितही त्यांनी वर्तविले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे शनिवारी अनौपचारिक वार्तालापात ते बोलत होते. जोसेफ राव व प्रदीप मैत्र यांनी त्यांचे स्वागत केले.
सोनिया गांधी या मौलवींनाच भेटतात आणि पाठिंबा मागतात, यासंदर्भात भाजपने केलेल्या आरोपांकडे लक्ष वेधले असता मलिक म्हणाले, सोनिया गांधी मौलवीच नव्हे, तर विविध धर्मगुरूंनाही भेटतात. कारण, त्या सर्व जातीधर्माला सोबत घेऊन चालतात. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. मुस्लिम समाज मौलवींनी पाठिंबा दिला म्हणून मतदान करीत नाहीत. मुळात राजकीय पुढारी व धर्मगुरू वा मौलवी हे फसवणूकच करीत असतात. राजकीय पक्षांना पाठिंबा दिला म्हणून अनुयायींची संख्या वाढेल, असे मौलवी वा धर्मगुरूंना वाटते, तर धर्मगुरू वा मौलवींनी पाठिंबा जाहीर केल्याने मतांची संख्या वाढेल, असे राजकीय पुढाऱ्यांना वाटत असते. यातून ते एकमेकांची फसवणूक करीत असतात. फारसा फायदा कुणालाच होत नसतो.
सोनिया-बुखारी भेटीबाबत भाजपचे वक्तव्य म्हणजे दुटप्पी धोरण असल्याची टीका त्यांनी केली. भाजपने याआधी ‘अटल हिमायत समिती’ स्थापन केली होती. त्यात लखनऊ, अजमेरचे मौलवी, मुजावर लोक घेतले होते. बुखारीसुद्धा त्यात होते. बुखारींनी याआधी भाजपला, मुलायमसिंह यादव, तसेच गेल्या वेळेस आम आदमी पक्षालाही पाठिंबा दिलेला आहे. बुखारी यांचे बरेच भाऊ असून ते विविध पक्षांना पाठिंबा जाहीर करीत असतात, असे नवाब मलिक म्हणाले.
नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील अध्यक्षीय प्रणाली देशात आणू पहात आहेत. भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात ही प्रणाली शक्यच होणार नाही. भाजपने हातमिळवणी एकाशी, तर मनसेशी छुपी युती केली आहे. ठाकरे कुटुंबातील भांडणाचे आता महाभारतात रूपांतर झाले आहे. हातमिळवणी एकाशी तर छुपी युती दुसऱ्याशी ही भाजपची खेळी यशस्वी होऊ शकणार नाही. मोदी लाट नसून धर्माध शक्तीच्या विरोधात पुरोगामी विचारांची त्सुनामी उसळून वर येणार आहे. १९८८ मध्ये होती तशीच परिस्थिती यंदा आहे. वातावरण अनुकूल आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला १२-१३, तर आघाडीला यंदा ३८ जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा