कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील यंत्रमागधारकांनी पाच दिवसांचा बंद यशस्वी केला असून उद्या मंगळवारपासून उद्योजकांनी उद्योग पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्युत पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून झाल्यास संबंधित भागातील यंत्रमागधारकांनी एकत्र येऊन ठामपणे प्रतिकार करावा व विद्युत पुरवठा खंडित करण्याचा प्रयत्न शांततापूर्ण मार्गाने हाणून पाडावा, असे आवाहन इचलकरंजी शहर व परिसर समन्वय समितीच्या वतीने सर्व संघटना प्रमुखांनी सोमवारी केले.
समन्वय समितीच्या वतीने बंदचा आढावा घेण्यासाठी व पुढील आंदोलनासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या आजच्या बैठकीस आमदार सुरेश हाळवणकर, अशोक स्वामी, प्रताप होगाडे, पुंडलिक जाधव, दीपक राशीनकर, विनय महाजन, सचिन हुक्कीरे, विश्वनाथ मेटे, अजित जाधव, गोरखनाथ सावंत, सतीश राठी, बंडोपंत लाड, गणेश भांबे, काशीनाथ जगदाळे, रावसाहेब तांबे, चंद्रकांत जोग, दिनकर आनुसे, राजन मुठाणे, जावीद मोमीन उपस्थित होते. समन्वय समितीच्या १३ नोव्हेंबरच्या राज्यस्तरीय बैठकीत पुढील आंदोलनाबाबत जो निर्णय होईल. त्यामध्ये सहभागी व्हावे असाही निर्णय याबैठकीत घेण्यात आला.
यंत्रमागधारक जुन्या दराने बिले भरण्यास तयार आहेत. त्याप्रमाणे महावितरणने बिले भरून घ्यावीत. पोलीस बळाच्या जोरावर वीजपुरवठा खंडित करून उद्योग बंद ठेवण्याचा प्रयत्न झाल्यास तो यंत्रमागधारक संघटितपणे मोडून काढतील. नारायण राणे समितीचा निर्णय होईपर्यंत शासनाने आतताई कृती करू नये, अन्यथा यंत्रमाग बेमुदत बंद ठेवावे लागतील, असा इशारा आमदार हाळवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
कोल्हापूर, सांगलीत यंत्रमागधारकांचा बंद
कोल्हापूर व सांगली जिल्ह्य़ातील यंत्रमागधारकांनी पाच दिवसांचा बंद यशस्वी केला असून उद्या मंगळवारपासून उद्योजकांनी उद्योग पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
First published on: 12-11-2013 at 01:38 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Close of power loom holder in kolhapur sangli