मागील जानेवारीपासून जालना शहरातील पथदिव्यांचा खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा ऐन दिवाळीतही सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे दिवाळीच्या काळात ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही जालना शहरातील जवळपास २५ पथदिवे बंदच होते.
शहरातील पथदिव्यांच्या विजेचे बिल अनेक वर्षांपासून नगर परिषदेकडून नियमित भरले जात नाही. मार्च २०१३ पर्यंतची थकबाकी मूळ बिल, त्यावरील व्याज आणि दंडासह १४ कोटी १४ लाख ३४ हजार रुपये एवढी आहे. पथदिव्यांसाठी नगर परिषदेने शहरात ठिकठिकाणी २०९ वीजजोडण्या घेतलेल्या आहेत. गेल्या फेब्रुवारी-मार्च महिन्यापर्यंतची पथदिव्यांच्या वीजबिलांची मूळ थकबाकी ९ कोटी २८ लाख ४१ हजार रुपये आहे. तर त्यावरील व्याज आणि दंडाची रक्कम जवळपास ४ कोटी ८५ लाख रुपये आहे. थकबाकी वसुलीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने ‘अभय योजना’ लागू केली आहे. या योजनेअंतर्गत मूळ वीजबिल भरले तर व्याज आणि विलंबाबद्दलचा दंड माफ करण्यात येतो. जालना नगर परिषदेने अभय योजनेचा लाभ घेतला तर ४ कोटी ८६ लाख रुपये वीजबिल माफ होऊ शकते. परंतु त्यासाठी मूळ थकीत बिलाची रक्कम २४ हप्त्यांत नगर परिषदेस दरमहा ३८ लाख ६८ हजार रुपये भरावे लागतील आणि त्याशिवाय दर महिन्याचे १५ लाख रुपये नियमित बिलही भरावे लागणार आहे. म्हणजेच पथदिव्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी नगर परिषदेस दोन वर्षे दरमहा जवळपास ५५ लाख रुपये भरण्याची तयारी ठेवावी लागेल. सध्या तरी हे नगर परिषदेच्या आवाक्याबाहेर असल्याने मागील दहा महिन्यांपासून जालना शहरातील पथदिवे बंदच आहेत आणि दिवाळीच्या काळात ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही ते बंदच होते.
पथदिव्यांप्रमाणेच जालना नगर परिषदेकडे पाणीपुरवठय़ाशी संबंधित विजेची सुमारे ५७ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यामध्ये १४ कोटी रुपये व्याज आणि दंडाचा समावेश आहे. ‘अभय योजना’अंतर्गत व्याज आणि दंडाची रक्कम माफ केली तरी वीज वितरण कंपनीकडे मूळ बिलाचे ४३ कोटी रुपये नगर परिषदेस भरावे लागतील. यापूर्वी मूळ बिलाचे २४ समान हप्ते ‘महावितरण’ने पाडून दिले होते आणि त्यानुसार १ कोटी ८० रुपये भरणा झालेला आहे. उर्वरित ४१ कोटी २० लाख रुपये मूळ थकबाकी ६० समान हप्त्यांत भरण्यास महावितरणने सांगितले आहे. अभय योजनेचा लाभ घ्यायचा तर नगर परिषदेस दरमहा ७० लाख रुपये आणि त्या महिन्याचे नियमित बिल सलग पाच वर्षे भरावे लागणार आहे.
पाणीपुरवठय़ाच्या पाच पंप हाऊसवरील ही थकबाकी आहे. मस्तगड, जलशुद्धीकरण केंद्र, सव्र्हे क्रमांक ४८८, शहागड आणि अंबड (जुने कनेक्शन) या पाच पंप हाऊसची ही थकबाकी आहे.
थकबाकीच्या संदर्भात कडक धोरण स्वीकारल्यामुळे जालना नगर परिषदेने आता ‘महावितरण’च्या संदर्भातही वेगळी भूमिका घेण्याचे ठरविले आहे. जालना शहरात पथदिव्यांसाठी जवळपास २५ हजार खांब आणि १ हजार विद्युत ट्रान्सफार्मर उभे आहेत. त्यावर नियमाप्रमाणे ‘महावितरण’वर वार्षिक कर आकारण्याचे नगर परिषदेने ठरविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा