दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी

कॅम्प परिसरातील अर्चना नितीन मडावी (२९) हिला प्रसुतीसाठी २१ सप्टेंबरला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. २२ सप्टेंबरला शस्त्रक्रियेद्वारे प्रसुती झाली, मात्र डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अर्चनाच्या पोटात एक फूट लांबीचा कापड तसाच राहिला. त्यामुळे वेदना सुरू झाल्या. याची माहिती शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना देऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर अर्चनाला तात्काळ नागपूरला हलवून शस्त्रक्रिया करून पोटातील कापड काढण्यात आले. याप्रकरणी जबाबदार असणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी पीडित महिलेचा भाऊ धीरज खोब्रागडे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.
धीरज खोब्रागडे यांनी सांगितले की, शस्त्रक्रिया करून प्रसुती झाल्यावर बाळ व बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याचे प्रमाणपत्र वैद्यकीय अधिकारी डॉ. छाया उईके यांनी दिले. २९ सप्टेंबरला रुग्णालयातून सुटी देण्यात आली, मात्र दुसऱ्या दिवशीपासून अर्चनाच्या पोटाच्या उजव्या बाजूला तीव्र वेदना होऊ लागल्या. याबाबत डॉक्टरांकडे तक्रार करूनही त्यांनी दुर्लक्ष केले. पोटातील वेदना थांबत नसल्याने स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सोयाम यांच्या गोकुल मॅटनिर्टी क्लिनिक येथे तीन वेळा तपासणी करण्यात आली, मात्र त्यांनाही पोटात कापड असल्याचे निदान झाले नाही. केवळ गोळ्या देऊन वेदना थांबविण्याचे उपचार सुरू होते. पोटातील दुखण्याचा त्रास वाढत असल्याने एक महिन्यानंतर २० ऑक्टोबरला डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या हॉस्पिटलमध्ये तपासणी करून सोनोग्राफी करण्यात आली तेव्हा पोटात कापड असल्याचे व कापडामुळे रक्त खराब होऊन पू तयार झाल्याचे दिसून आले. त्यानंतर २१ ऑक्टोबरला अर्चना मडावीला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करून सोनोग्राफीचा अहवाल डॉक्टरांना दाखविण्यात आला, मात्र यावेळी सुद्धा येथील डॉक्टरांनी थातूरमातूर तपासणी करून थोडासा त्रास आहे, असे सांगितले.
दिवसभर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल असताना येथील स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सोयाम व डॉ. किलनाके यांना रुग्णालयात तपासणीसाठी बोलविण्यात आले, मात्र ते सुद्धा तपासणी न करताच निघून गेले. या दरम्यान अर्चनाला अचानक चक्कर आल्याने रक्त उपलब्ध करून दुपारी ३ वाजता तिच्यावर उपचार सुरू झाला, मात्र दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी अचानक तिला नागपूरला हलविण्याचा सल्ला दिला. महिलेच्या पोटातील रक्त दूषित झाले असून रुग्णालयात स्त्री रोगतज्ज्ञ हजर नाही त्यामुळे शस्त्रक्रियेला विलंब होईल, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.त्यामुळे अर्चनाला तात्काळ नागपूरला हलवून २२ ऑक्टोबरला शस्त्रक्रिया करून पोटातून एक फूट लांबीचे कापड काढण्यात आले. याला जिल्हा सामान्य रुग्णालयाचे प्रशासन जबाबदार असून स्त्री रोगतज्ज्ञांविना शस्त्रक्रिया करण्यात आलीच कशी, असा प्रश्न धीरज खोब्रागडे यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली असून मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, मेडिकल कौन्सिल व महिला आयोगाकडे पाठविले आहे.