* उद्योजकांचा मोठा प्रतिसाद अपेक्षित
* मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने २०० पत्रे रवाना
‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ औद्योगिक परिषद २५ आणि २६ फेब्रुवारी या नियोजित तारखांनाच घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत देऊन आयोजनाला ग्रहण लावण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न उधळून लावले. ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’च्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या या बैठकीला पालकमंत्री शिवाजीराव मोघे, ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, उद्योग खात्याचे प्रधान सचिव  मनुकुमार श्रीवास्तव, वस्त्रोद्योग खात्याचे प्रधान सचिव सुनील पोरवाल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, नागपूरचे विभागीय आयुक्त व्ही. गोपाल रेड्डी तसेच फिक्कीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आयोजन यशस्वी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांनी यासाठी पुढाकार घेतला असून २०० पत्रे पाठविली आहेत. त्यापैकी दीडशे उद्योजक प्रतिनिधी आणि गुंतवणूकदारांचा सहभाग अपेक्षित आहे. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत १३० प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. नागपूरचे देशात असलेले मध्यवर्ती स्थान, मिहानसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, पायाभूत सुविधा, नैसर्गिक संसाधने आणि उपलब्ध मनुष्यबळ यामुळे अ‍ॅडव्हांटेजमध्ये सकारात्मक प्रतिसादातून ठोस निष्पन होईल, असा विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बैठकीत व्यक्त केल्याने आयोजकांचा उत्साह वाढला आहे. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्य़ातील उद्योगांची स्थिती निश्चित करण्यासाठी जमीन, पाणी, रस्ते, कच्चा माल याविषयीची सविस्तर माहिती तयार करून गुंतवणूकदारांना आवाहन केले जाणार आहे. विदर्भातील वीज, पाणी, पर्यटन, दळणवळणाची साधने, उद्योगांसाठीची जागा याबाबत ग्लोबल उद्योग जगताला माहिती दिली जाईल.
कृषी, सहकार, अन्न प्रक्रिया, माहिती व जैव तंत्रज्ञान, ऑटो हब यासोबतच हवाई क्षेत्रातील गुंतवणुकीची शक्यताही पडताळून पाहिली जाणार आहे. या विषयांवरील सादरीकरण आणि चर्चासत्रांमधून गुंतवणूकदारांना आकर्षित केले जाणार आहे. मंगळवापर्यंत ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ च्या तयारीला फार कमी वेळ असल्याने आयोजनाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, मुख्यमंत्र्यांनी याबाबतचा संभ्रम दूर केला. उद्घाटनाला मुख्यमंत्री येणार
आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा