एलपीजीच्या किमती वाढल्यामुळे आता घरगुती वापरासाठी सीएनजी घेण्याकडे नागरिकांचा कल वाढत असून लवकरच पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला सीएनजीचा पुरवठा व्हावा यासीठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार मोहन जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. एलपीजीच्या तुलनेमध्ये सीएनजीची किंमत कमी असल्यामुळे नागरिक घरगुती वापरासाठी सीएनजीला प्राधान्य देत आहेत. सीएनजीचा सध्याचा दर हा प्रतिकिलो २१ रुपये २८ पैसे आहे, तर एलपीजीचा दर अनुदानित कोटय़ासाठी साधारण २९ रुपये आणि विनाअनुदानित कोटय़ासाठी साधारण ६४ रुपये आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या कंपनीतर्फे सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडला सीएनजीचा पुरवठा करण्यात येत आहे. याबाबत जोशी म्हणाले,‘‘सध्या पुण्यातील अनेक भागांमध्ये पाईपद्वारे सीएनजीचा पुरवठा करण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सर्वत्र सीएनजीचा पुरवठा सुरू व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे वाहनचालकांसाठी येत्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये पुणे शहरात कात्रज, मुकुंदनगर व्हेईकल डेपो, बावधन, मुंढवा, पौड रस्ता, हिंजवडी, चंदननगर, वारजे, शिवाजीनगर आणि पिंपरीमध्ये संत तुकाराम नगर या दहा ठिकाणी नवे पंप सुरू होणार आहेत. तसेच हडपसरयेथील सीएनजी पंपाचे काम १९ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये असलेले पंधरा सीएनजी पंप चोवीस तास सुरू राहावेत आणि चोवीस तास पंप सुरू न ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन मी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.’’     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा