काही वर्षांपूर्वी वीस लाख क्विंटलपर्यंत साखरेचे उत्पादन घेणाऱ्या विदर्भातील सहकारी साखर कारखानदारीचे अस्तित्व आता संपुष्टात आले असून, त्यांची जागा खासगी कारखान्यांनी घेतली आहे. यंदाच्या हंगामात विदर्भातील सहा खासगी कारखान्यांनी ८.८५ लाख क्विंटल साखर उत्पादित केली. आता विक्रीत निघालेले सहकारी साखर कारखाने खासगी उद्योजकांकडून चालवले जातील का? हा प्रश्न कायम आहे.
विदर्भातील सोळापैकी पंधरा सहकारी साखर कारखाने बंद पडले. ते पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले नाहीत. उलट अवसायनात काढून विक्रीच्या प्रक्रियेपाशी आणून ठेवले गेले. अपरिहार्यपणे त्यांच्या विक्रीचा निर्णय घेतला गेला, असे सरकारतर्फे सांगण्यात आले. काही कारखान्यांचा लिलाव झाला. काही थेट विकण्यात आले. त्यापैकी तीनच कारखाने खासगी उद्योगांकडून पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. व्यवस्थापनातील त्रुृटी, निर्णयक्षमेचा अभाव, निर्णय प्रक्रियेत लागलेला विलंब, ऊसाची कमी उपलब्धतता, जोड धंद्यांचा अभाव, भ्रष्टाचार अशा अनेक कारणांमुळे विदर्भातील बहुतांश कारखान्यांना टाळे लागले. काही कारखाने तर ऊस उपलब्ध नाही, म्हणून बंद पडले. ऊस नसताना या कारखान्यांना उभारणीची परवानगी कशी मिळाली, हा अजूनही संशोधनाचा विषय आहे. ज्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे कारखाने दिवाळखोरीत निघाले, त्यांची साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. केवळ चौकशी समिती स्थापन करण्यापुरते सोपस्कार पार पाडण्यात आले आहेत. विदर्भातील साखर कारखाने विकले गेल्यानंतर त्यावरील शेतकरी सभासदांचा हक्कही मोडीत निघाला आहे. त्यांच्याबद्दल बोलायला आज कुणीही तयार नाही. या कारखान्यांच्या उभारणीसाठी कामाला लागलेल्या हातांचे मोल वाया गेले आहे. कर्मचारी बेरोजगार झालेच शिवाय शेतकऱ्यांचेही स्वप्न भंग झाले. २००६-०७ च्या हंगामात विदर्भात ४ सहकारी आणि ४ खासगी साखर कारखान्यांची गाळप केले. त्यावेळी १४.८५ लाख साखरेचे उत्पादन झाले. २००७-०८ मध्ये ५ सहकारी आणि ५ खासगी कारखान्यांनी १९.६९ लाख क्विंटलपर्यंत झेप घेतली, पण त्यानंतर साखर कारखानदारीला उतरती कळा आली. २००८-०९ मध्ये ४ सहकारी आणि ४ खासगी कारखाने केवळ २.९२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेऊ शकले. २००९-१० मध्ये सहा कारखान्यांचे उत्पादन होते केवळ २.६१ लाख क्विंटल. यंदा विदर्भात सर्वाधिक उतारा १०.८० टक्के वसंत सहकारी साखर कारखान्याचा (जि. यवतमाळ) आहे. वसंत सहकारीने २ लाख ६६ हजार मे.टन ऊसाचे गाळप करून २ लाख ८८ हजार क्विंटल साखर उत्पादित केली. खासगी कारखान्यांपैकी पूर्ती पॉवर अ‍ॅन्ड शुगरने (जि. नागपूर) २.९५ लाख मे. टन गाळप आणि २.६४ लाख क्विंटल उत्पादन, महात्मा शुगर अ‍ॅन्ड पॉवरने (जि. वर्धा) २.०२ लाख मे.टन गाळप आणि २.०२ लाख क्विंटल उत्पादन, वैनगंगा शुगर अ‍ॅन्ड पॉवरने (जि. भंडारा) २.८१ लाख मे.टन गाळप, १.८९ लाख क्विंटल उत्पादन, नॅचरल ग्रोअर्स (जि. भंडारा) ५८ हजार मे.टन गाळप, ५५ हजार क्विंटल उत्पादन, तर विदर्भ शुगरने (जि. अमरावती) १० हजार मे.टन ऊसाचे    गाळप  करून ६ हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले.     (क्रमश:)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा