शुल्क परत देण्यास टाळाटाळ
कॉलेज रोडवरील थत्तेनगर परिसरात सीबीएससी फोरम या क्लासने फसवणूक केल्याची तक्रार पालकांनी केली आहे. या प्रकरणी बुधवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याची मागणी पालक करणार आहेत. दरम्यान, पूर्ण अभ्यासक्रम शिकविल्याचा दावा करत संबंधित विद्यार्थ्यांशी क्लासचा कोणताही संबंध नसल्याचे संचालकांनी म्हटले आहे.
सध्या शहर परिसरात खासगी क्लासचे पेव फुटले आहे. वेगवेगळ्या जाहिरातीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आकर्षित केले जाते. सीबीएससी फोरम क्लासने याच पद्धतीने २० हून अधिक पालकांना गंडा घालण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या क्लासच्या नाशिकरोड व इंदिरानगर परिसरात स्वतंत्र शाखा होत्या. इंदिरानगर भागातील काही पालकांनी आपल्या पाल्यांचा एप्रिल २०१२ मध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेतला. त्याकरिता एका वर्षांचे संपूर्ण शुल्क म्हणजे २० हजार रूपये मोजले. परंतु तेथील शिकविण्याची पद्धत पसंत न पडल्याने पालकांनी एकत्रित बैठक घेत आपल्या पाल्यांचा प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात क्लास संचालकांना लेखी तक्रारही देण्यात आली. संपूर्ण शुल्कातून तुमची अपेक्षित रक्कम वजा जाता उर्वरित पैसे परत करावे, अशी मागणी पालकांनी केली. प्रारंभी संचालकांनी ही मागणी मान्य करत काही पालकांना प्रत्येकी दोन ते तीन हजार रुपये दिले. मात्र नंतर प्रत्येक महिन्याला उर्वरित रक्कम देतो, अशी बतावणी करण्यात आली. मार्च महिन्यात काही पालकांना धनादेशही देण्यात आले. मात्र ते वटले नाहीत. दरम्यानच्या काळात इंदिरानगर येथील शाखा बंद पडली. कॉलेजरोडवरील ही मुख्य शाखा दुसरीकडे स्थलांतरीत झाली. क्लासमध्ये प्रवेश घेणारे पाल्य मध्यम वर्गातील आहे. प्रत्येक पालकाचे सरासरी १५-२० हजार रुपये अडकल्याने त्यांची आर्थिक ओढाताण झाली. याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करूनही भ्रमनिरास झाल्याचे पालकांकडून सांगण्यात आले. काही पालक विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंगळवारी थत्तेनगर परिसरातील शाखेत जाब विचारण्यास गेले असता तेथे टाळे लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पालकांनी पोलीस आयुक्तांकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, या संदर्भात क्लासचे संचालक संजय चाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी इंदिरा नगरची शाखा फेब्रुवारीमध्ये बंद करण्यात आल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना पुर्ण वर्षांचा अभ्यासक्रम शिकविण्यात आला आहे. आता संबंधित विद्यार्थी व क्लासचा काही एक संबंध नसल्याचा दावा चाटे यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा