कोल इंडिया, वेकोलिचे उच्च न्यायालयात शपथपत्र
गेल्या तीन वर्षांत ९४ टक्के उत्कृष्ट दर्जाचा कोळसा महाजनकोला पुरविण्यात आल्याचा दावा कोल इंडिया लिमिटेड व वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडने उच्च न्यायालयात सादर केलेल्या शपथपत्रातून केला आहे. निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरविण्यात आल्याच्या महानजकोच्या आरोपाचे या दोन्ही कंपन्यांनी खंडन केले.
अनिल वडपल्लीवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर केली असून वेकोलि व महाजनकोत सुरू असलेल्या शीतयुद्धामुळे राज्यातील वीज ग्राहकांना भारनियमनाचा दंश सहन करावा लागत असल्याचे यात म्हटले आहे. ग्राहकांना विजेची वाढती किंमतही चुकवावी लागत असून देशातील कोळशाच्या अपुऱ्या पुरवठामुळे उत्पादनाचा खर्च वाढला, असे कारण यासाठी दिले जात आहे. कोल इंडिया वा वेकोलि आणि महाजनको आपसात हा मुद्दा सोडविण्याची काळजी न घेता खाजगी कंपन्यांकडून निरंतर महाग कोळसा खरेदी करीत आहेत. यामुळे शासनाच्या तिजोरीवरील भार वाढतच असून सामान्य जनतेला अतिरिक्त नुकसान सहन करावे लागत आहे. विजेचा जादा भाव देण्याचे प्रत्येकवेळी औद्योगिक कंपन्यांना म्हटले जाते, असे या याचिकेत नमूद करण्यात आले आहे. महानजकोने वेकोलि व कोल इंडिया लिमिटेड या कंपन्यांकडून निकृष्ट दर्जाचा कोळसा पुरविला जातो आणि या कंपन्यांचे अधिकारी व कोल वॉशरीज संचालक यांचे हितसंबंध गुंतले असल्याचा आक्षेप यात घेण्यात आला होता.
यासंदर्भात या दोन्ही कंपन्यांच्या वतीने न्यायालयात शपथपत्र सादर करण्यात आले. महाजनकोला पुरविण्यात आलेल्या कोळशाचे प्रमाण इंधन पुरवठा करारानुसारच (एफएसए) होते. कोल वॉशरीज संचालकांसोबत हितसंबंध असल्याचाही वेकोलि व कोइंलि या दोन्ही कंपन्यांनी इन्कार केला. खाणींमधून कच्चा माल घेण्यास मदत व्हावी म्हणूनच महाजनकोनेच वॉशरी संचालकांची नियुक्ती केली आहे. २०१०-११ या वर्षांत ९९.९८ टक्के, २०११-१२ या वर्षांत वॉशरी संचालकांना हटविल्यानंतरही कच्च्या मालाचा शंभर टक्के पुरवठा करण्यात आल्याचा दावा शपथपत्रात करण्यात आला आहे.
निकृष्ट दर्जाचा आणि कमी प्रमाणात कोळशाचा पुरवठा केल्यामुळे कच्चा माल आयात करावा लागला, या महाजनकोच्या आरोपाचेही या शपथपत्रात खंडन करण्यात आले आहे. वेकोलिकडून २००९-१० या वर्षांत ८९.५० टक्के, २०१०-११ या वर्षांत ९१.३१ टक्के, २०११-१२ या वर्षांत ९० टक्के, २०१२-१३ या वर्षांत ९३ टक्के मालाचा पुरवठा करारानुसारच केला गेला. जमिनीतून काढल्या जाणाऱ्या कोळशाच्या गुणवत्तेत नैसर्गिक बदल असू शकतात. वेकोलि व महाजनको यांच्या संयुक्त नमुना तपासणीतही कोळशाचा दर्जा निकृष्ट असल्याचा उल्लेख नाही. कोळसा नियंत्रकांनाही महाजनकोच्या आरोपात तथ्य आढळून आले नसल्याचे शपथपत्रात म्हटले आहे.

Story img Loader