मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यतील कोळसा खाणीतून उपसलेल्या कोळशाची मालवाहू रेल्वेगाडीने चंद्रपूर, बल्लारशाह मार्गावरून मोठया प्रमाणात वाहतूक करण्यात येते. मात्र कोळसा घेऊन जाणारी मालगाडी ज्या थांब्यावर थांबली त्या ठिकाणचे स्थानिक लोक मोठया प्रमाणात कोळसाची चोरी करीत आहेत. चोरी स्पष्ट दिसत असताना रेल्वे प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे कोळसा चोरांना रान मोकळे मिळाले आहे.
कोळशाची चोरी करणा-यांना रेल्वे प्रशासनाचेच अभय असल्याचे बोलल्या जात असून होणारी कोळशाची चोरी थांबविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नाहीत. चंद्रपूर येथील ऊर्जानगर केंद्रात मध्य प्रदेश व छत्तीसगड राज्यातील कोळसाच्या खाणीतून कोळसा गोंदिया-बल्लारशाह मार्गाने चंद्रपूरकडे नेण्यात येतो. ही कोळसाची वाहतूक आठवडयातून चारदा करण्यात येते. गोंदिया ते बल्लारशाह हा अडीचशे किलोमीटर लांब पल्लयाचा मार्ग असून या मार्गावरून दररोज पाच पॅसेंजर गाडया ये-जा करीत असतात.त्यामुळे कोळसाची वाहतूक करणा-या मालगाडीला अनेक थांब्यावर थांबत-थांबत चंद्रपूरकडे जावे लागते. या कोळसाची वाहतूक करणाऱ्या मालगाडीत सुरक्षा रक्षकही नसतो. तेव्हा याच संधीचा फायदा घेऊन गोंदिया जिल्हयातील हिरडामाली, सौंदड, नवेगावबांध व गोंदिया रेल्वेस्थानकावर कोळसा भरलेली मालगाडी थांबली असता गावातील नागरिक मालगाडीतील कोळसाची चोरी करीत असतात. मात्र, रेल्वे थांब्यावरील रेल्वेचे कर्मचारी त्यांना कोळसा चोरण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न करीत नाही.
याबाबत एका रेल्वे कर्मचाऱ्याला विचारणा केली असता त्याने टाळाटाळीची उत्तरे देऊन कोळसाची चोरी करणारे स्थानिक नागरिक आहेत. त्यांच्यावर कारवाई कोण करणार असा प्रतिसवाल केला. त्यामुळे रेल्वे थांब्यावरील रेल्वे प्रशासनाचेही अभय कोळसा चोरणाऱ्या स्थानिक नागरिकांना असावे हे यावरून स्पष्ट होत आहे.
हा सर्व प्रकार रेल्वे प्रशासनाच्या डोळ्यासमोर घडत असतांना ही मालगाडीतील कोळसा चोरणा-या एकाही जणांवर आजपर्यंत कधीही कारवाई करण्यात आली नाही. कोळसाच्या खाणीतून कोळसा हा मालगाडीत वजन करून भरण्यात येत असतो. चंद्रपूरमध्ये मालगाडी रिकामी करण्यात आल्यावर कोळसाची मोजणी करताना नक्कीच तो कमी भरत असले तरीही रेल्वे प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे.
रेल्वे थांब्यावर मालगाडीतील कोळशाची बिनधास्त चोरी
मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यतील कोळसा खाणीतून उपसलेल्या कोळशाची मालवाहू रेल्वेगाडीने चंद्रपूर, बल्लारशाह मार्गावरून मोठया प्रमाणात वाहतूक करण्यात येते. मात्र कोळसा घेऊन जाणारी मालगाडी ज्या थांब्यावर थांबली त्या ठिकाणचे स्थानिक लोक मोठया प्रमाणात कोळसाची चोरी करीत आहेत.
First published on: 28-12-2012 at 01:52 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coal stolen from wagan on railway stop