हेमंत गोडसे यांचा थेट आरोप
आगामी लोकसभा निवडणूक ही छगन भुजबळ यांना सोयीची व्हावी, कुठलाही प्रबळ दावेदार त्यांच्यासमोर उभा राहू नये, यासाठी पक्षाचे कामकाज व निवड प्रक्रियेत आपणास जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचा पुनरूच्चार करत यामागे मनसेचे आ. वसंत गिते आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांची छुपी युती कारणीभूत असल्याचा आरोप नगरसेवक हेमंत गोडसे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेत दाखल झालेल्या गोडसे यांनी केलेल्या या थेट आरोपांमुळे मनसे तसेच राष्ट्रवादीतही खळबळ उडाली आहे
आ. गिते यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांना गोडसे यांनी प्रत्युत्तर दिले. उत्तर महाराष्ट्रात जिल्हा परिषदेतील एकमेव सदस्य असताना आणि मनसेची राज्यात कुठलीही सत्ता नसतांना आपण जिल्हा परिषदेच्या निधीचा वापर करण्याव्यतिरिक्त राज्य व केंद्र शासनाच्या योजना गटात राबविल्या. त्याचा सविस्तर अहवाल जनतेला दिला असून त्यात कोणते काम कोणत्या निधीतून केले, तसेच त्या कामाची सद्यस्थिती काय आहे याचाही अंतर्भाव असल्याचे गोडसे यांनी सांगितले. याउलट गिते यांनी आमदारकीच्या आतापर्यंतच्या काळात आपल्या मतदार संघात कोणती उल्लेखनीय कामे केली, याचा खुलासा करावा असे आव्हानही त्यांनी दिले. अन्याय झाल्यामुळे आपण पक्ष सोडला. गिते यांना १५ वर्षांपूर्वी शिवसेनेने महापौर केले. त्यानंतरही ते शिवसेना सोडून गेले. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलेल्या लोकांनी आपल्याला पक्षनिष्ठा शिकवू नये, असा टोलाही गोडसे यांनी लगावला.
आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा अशी भूमिका मनसे घेत असला तरी स्थानिक पातळीवर प्रामुख्याने एका जातीचा विचार केला जातो. मनसेत आपली घुसमट झाली. आजवर पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये जाणीवपूर्वक डावलण्यात आले. तसेच पक्षांतर्गत कोणत्याही कामकाजात विश्वासात घेण्यात आले नाही. स्थानिक पदाधिकारी हे राज ठाकरे यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप गोडसे यांनी केला.
मागील लोकसभा निवडणुकीत भुजबळांचा सामना करण्यासाठी एकही प्रबळ दावेदार नसल्याने आपल्याला उमेदवारी देण्यात आली. मात्र अटीतटीच्या निवडणुकीत आपण १५ हजारांनी मागे राहिलो. त्यावेळीही गिते यांनी सहकार्य न केल्याने आपल्याला पराभव पत्करावा लागला. गिते हे नेहमी जातीचे राजकारण करत आले आहेत. राज यांच्या करिष्म्यामुळे आपण निवडून आलो हे खरे असले तरी लोकांनी टाकलेल्या विश्वासाचे चीज करण्यासाठी व जनसंपर्क कायम राखण्यासाठी आपण सातत्याने विविध उपक्रम राबविल्याने पालिका निवडणुकीत आ. बबन घोलप यांच्या प्रभाव क्षेत्रातील प्रभागात जिंकलो. महापौरपद हे सर्वसामान्य पुरूष गटासाठी खुले असताना जातीचे राजकारण करण्यात येऊन आपल्याला डावलण्यात आले. त्यानंतर स्थायी समिती सभापतीपदासाठी अर्ज भरण्यास सांगण्यात आले. नंतर अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव आणण्यात आला. या माध्यमातून आपला अपमान करण्यात आल्याचे शल्य गोडसे यांनी मांडले. वेळोवेळी राज यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यापर्यंत पोहचु दिले नसल्याची खंत गोडसे यांनी व्यक्त केली.

नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याची मागणी मनसेकडून होत आहे. राज ठाकरेंनी आदेश दिला तर आपण राजीनामा देऊ. मात्र जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी आपण स्वत:हून राजीनामा देणार नाही. आपल्या पक्षांतरानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या मनातील खदखद आपल्याकडे व्यक्त केली. लवकरच अनेक बडी मंडळी पक्षांतर करणार असून अनेक इच्छूक आपल्या संपर्कात आहेत. आगामी निवडणुकीत आपल्याला उमेदवारी दिली नाही तरी आपली सामान्य शिवसैनिक म्हणून काम करण्याची तयारी असल्याचे गोडसे यांनी सांगितले. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे जी जबाबदारी आपल्यावर टाकतील ती आपण निभाऊ असेही ते म्हणाले.

Story img Loader