शहर तसेच जिल्ह्य़ातील वीज चोरीचे प्रकार रोखण्यासाठी तसेच दैनिक तोटा कमी करण्यासाठी जिल्ह्यातील वितरण व वसुलीचा ठेका असलेल्या क्रॉम्प्टन ग्रीव्हज् कंपनीकडून आवरण असलेली वाहिनी टाकण्यात येत आहे. थकीत ६७ कोटी वसूल करण्यासाठी पोलीस बंदोबस्तात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
दोन वर्षांपासून ठेका असलेली क्रॉम्प्टन ग्रीव्हज् कंपनी आजपर्यंत फक्त तोटाच सहन करीत असल्याचे येथील कंपनीचे मुख्य अधिकारी डॉ. विजय सोनवणे यांनी सांगितले. थकबाकी वसुलीसाठी आता पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत ग्राहकांची जोडणी खंडित केली जाणार असून थकबाकी भरा किंवा अंधारातच राहा या उद्देशाने कंपनी आता काम करणार आहे. वसुली व जोडणी खंडित करण्यास विरोध करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही कंपनीने दिला आहे.
जळगाव शहरात वीज चोरीचे प्रमाण प्रचंड प्रमाणात आहे. विद्युत वाहिन्यांवर आकडे टाकून वीज चोरीचे खुलेआम प्रकार हजारोंच्या संख्येतील घरांमध्ये बिनबोभाटपणे अनेक वर्षांपासून सुरू आहेत. चोरून वीज वापरणारे शेजारील इतरांना पैसे घेऊन वीजपुरवठा करीत असल्याचा प्रकारही शहरातील काही भागांत पाहावयास मिळतो. वीज चोरीचे हे प्रकार रोखण्यासाठी शहरातील विशिष्ट भागात प्लास्टिक आवरण असलेल्या वाहिन्या टाकण्याचे काम क्रॉम्प्टन कंपनीने हाती घेतले आहे.
शहरात यापूर्वी आकडे काढण्यासाठी गेलेल्या पथकांवर झालेल्या हल्ल्यांचे प्रकार पाहता पोलीस बंदोबस्त घेण्यात आल्याची माहिती सोनवणे यांनी दिली. शहरातील विद्युत मीटर नसलेल्या पण आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्या ३०० घरांमध्ये आकडे काढल्यानंतर मीटर लावण्यात आले आहेत. आकडे काढून टाकलेल्या सर्वानाच विद्युत मीटर तातडीने देण्यात येत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा