लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षांकडून फलक वा तत्सम मार्गाने प्रचार होणार नाही याची पुरेपुर दक्षता निवडणूक यंत्रणा घेत असली तरी राष्ट्रवादी आणि मनसेकडून खुष्कीच्या मार्गाने प्रचार सुरू असल्याचे दिसत आहे. काही महिन्यांपूर्वी उभय पक्षांमध्ये शहरातील जॉगिंग ट्रॅक व सार्वजनिक उद्यानांमध्ये व्यायामाचे साहित्य बसविण्याची स्पर्धा लागली होती. निसर्गाच्या सानिध्यातील या व्यायामशाळा आता राष्ट्रवादी आणि मनसेच्या प्रचाराचे एक साधन ठरल्या आहेत. कारण, भुजबळ फाऊंडेशनने उभारलेल्या ‘ग्रीन जीम’च्या काही ठिकाणी फलकांवर प्रेरणास्थान म्हणून छगन भुजबळ तर संकल्पना खा. समीर भुजबळ यांची नांवे खुलेआम झळकत आहेत. मनसेने उभारलेल्या व्यायामशाळाभोवती असा नामफलक झाकलेला असला तरी आसपास रंगविलेली बाकडे पाहिल्यावर ही व्यायामशाळा कोणाची देण आहे ते लक्षात येते. आचारसंहितेचा बडगा दाखविणाऱ्या यंत्रणेचे छुप्या मार्गाने चाललेल्या या प्रचाराकडे दुर्लक्ष झाले आहे.
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आणि सार्वजनिक ठिकाणी झळकणारे राजकीय पक्षांचे फलक, झेंडे वा तत्सम साहित्य हटविण्याची धडक मोहीम हाती घेतली गेली. निवडणूक काळात या माध्यमातून कोणाचाही प्रचार केला जाऊ नये म्हणून ही खबरदारी नेहमी घेतली जाते. विद्यमान आमदार वा खासदारांनी केलेल्या विकास कामांवर त्यांचे नामफलक झळकत असतात. आचारसंहितेच्या काळात नामोल्लेख असणारे हे फलक झाकून ठेवले जातात. इतकेच नव्हे तर, खासदार, आमदार वा अन्य लोकप्रतिनिधीशी संबंधित नाम फलकांवर आचारसंहितेचा बडगा पडत असतो. या लोकसभा निवडणुकीत मात्र काही राजकीय पक्षांना त्यात सवलत तर काही पक्षांना अप्रत्यक्षपणे प्रचार करण्याची मुभा मिळाल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे.
शहरात जॉगिंग ट्रॅक व सार्वजनिक उद्यानांचे प्रमाण लक्षणिय असून या ठिकाणी व्यायामासाठी येणाऱ्यांची संख्या अतिशय मोठी आहे. ही बाब हेरून मनसेने जवळपास दहा जॉगिंग ट्रॅकवर व्यायामासाठी उपयुक्त ठरतील असे साहित्य बसविण्याचे काम हाती घेतले. पुढे त्याचा कित्ता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या भुजबळ फाऊंडेशनने गिरविला. फाऊंडेशनने शहरातील जवळपास २२ जॉगिंग ट्रॅक व सार्वजनिक उद्यानात निरोगी आरोग्यासाठी ‘ग्रीन जीम’ उभारण्यात आली आहे. कृषीनगर जॉगिंग ट्रॅक, महात्मानगर क्रिकेट मैदान, शिखरेवाडी जॉगिंग ट्रॅक, आकाशवाणी केंद्राजवळील जॉगिंग ट्रॅक आदींचा त्यात समावेश आहे. या व्यायामशाळेचा लाभ प्रत्येक ठिकाणी दररोज शेकडो नागरीक घेत असताना त्याचा प्रचारासाठी कौशल्यपूर्वक वापर करण्याचे धोरण मनसे व राष्ट्रवादीने ठेवल्याचे दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित फाऊंडेशनने उभारलेल्या या व्यायामशाळाच्या ठिकाणी ते कोणी उभारले याचे फलक उभारण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्यावर काही ठिकाणी नामफलक झाकून ठेवण्यात आले. परंतु, काही ठिकाणी ते आजही तसेच आहेत. मनसेने गोल्फ क्लब येथे उभारलेल्या व्यायामशाळेजवळील फलक मात्र झाकलेला आहे. पण या ठिकाणी बाकडय़ांवर मनसेचा झेंडा रेखाटण्यात आला आहे. त्यामुळे येथे भेट दिल्यावर ही व्यायामशाळा कोणी उभारली ते सहजपणे लक्षात येते. राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेकडून खुष्कीच्या मार्गाने चाललेल्या या प्रचाराकडे निवडणूक यंत्रणेबरोबर विरोधी उमेदवारांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
निवडणूक यंत्रणेचा अजब न्याय
आचारसंहिता लागू झाल्यावर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्ष, पदाधिकारी वा लोकप्रतिनिधींचे झळकणारे अनधिकृत फलक एकतर जप्त केले अथवा अधिकृत फलक झाकून ठेवले. परंतु, फलक झाकून ठेवताना मनसेचे आ. वसंत गिते यांना एक न्याय तर भाजपचे खा. हरिश्चंद्र चव्हाण यांना दुसरा न्याय दिला गेल्याचे लक्षात येते. वसंत गिते यांच्या निवासस्थानाकडे जाणारा रस्ता दर्शविणारा फलक अद्याप झाकलेला नाही तर दुसरीकडे हरिश्चंद्र चव्हाण यांचे निवासस्थान दर्शविणारा फलक मात्र झाकून ठेवण्यात आला आहे. महापालिकेतील सत्ताधारी असणाऱ्या मनसे-भाजपच्या लोकप्रतिनिधीमध्ये यंत्रणेने दुजाभाव केल्याचे लक्षात येते.
राजकीय मैदानात आचारसंहितेचा ‘खेळ’
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी राजकीय पक्षांकडून फलक वा तत्सम मार्गाने प्रचार होणार नाही याची पुरेपुर दक्षता निवडणूक यंत्रणा घेत असली तरी राष्ट्रवादी आणि मनसेकडून खुष्कीच्या मार्गाने प्रचार सुरू असल्याचे दिसत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-03-2014 at 04:54 IST
TOPICSआचारसंहिता
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Code of conduct game no political ground