नवी मुंबई पालिकेच्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या निवडणुकीतील मतदारांची यादी अद्याप प्रसिद्ध न झाल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची आचारसंहिता लावण्याचा कार्यक्रम एक-दोन दिवसाकरिता पुढे ढकलेला आहे. शुक्रवारी १३ मार्च रोजी आचारसंहिता लागण्याची शक्यता होती, पण ठाणे तहसीलदारांना मतदारयादी प्रसिद्धीला अद्याप मुहूर्त लाभलेला नाही. एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात ही निवडणूक होणार असून त्यासाठी सुट्टीचा दिवस मतदानासाठी निवडला जाण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई पालिकेची पाचवी सार्वत्रिक निवडणूक एप्रिल महिन्यातच्या दुसऱ्या आठवडय़ात होणार आहे. त्यासाठी लागणारी प्रभाग रचना आणि आरक्षण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात झाले आहे. त्यावरील हरकती व सूचनादेखील पूर्ण झालेल्या आहेत. सध्या प्रभाग निहाय मतदारयाद्या तयार करण्याचे काम सुरू आहे.
पािलकेचे अधिकारी कर्मचारी त्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. सॅटेलाइट पद्धतीने करण्यात आलेली ही प्रभाग रचना काही ठिकाणी वेडीवाकडी आहे. त्यामुळे मतदारयादीत घोळ होऊ नये यासाठी या याद्या काटेकोरपणे तयार केल्या जात असून ११ लाख २० हजार ४४७ मतदारांची विभागनी १११ प्रभागात केली जात आहे.
एक प्रभाग सात ते आठ हजार मतदारांचा राहणार आहे. हे काम अद्याप सुरू असल्याने निवडणूक आयोगाला आचारसंहिता जाहीर करण्यात अडचण आली आहे. एक दोन दिवसांत या मतदारयाद्या जाहीर झाल्यानंतर तात्काळ आचारसंहिता जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे शनिवार किंवा रविवारीदेखील आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात असून पालिका यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीचा दिवस ठरविताना मुलांच्या परीक्षा, परगावी जाणारे मतदार यांचाही विचार केला जाणार असून मतदार सुट्टी करण्यासाठी बाहेर जाण्यापूर्वी मतदान घेतले जाणार आहे.
दहावी बारावीच्या परीक्षा या महिन्यात संपणार आहेत, पण बारावीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक सीईटीसाठी थांबणार आहेत. कडाक्याच्या उन्हात पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी सुट्टीचा दिवस निवडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील महिन्यातील दुसऱ्या आठवडय़ातील रविवारी या निवडणुकीसाठी मतदान होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा