आचारसंहिता लागू झाल्यानंतर कार्यप्रवण झालेल्या महापालिकेची सलग दुसऱ्या दिवशी राजकीय पक्षांचे फलक, कायमस्वरुपी फलक, झेंडे आदी जप्त करण्याची मोहीम सुरू राहिली. गुरूवारी अतिक्रमण विरोधी विभागाने वेगवेगळ्या भागातून राजकीय पक्ष व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे ४३ ‘होर्डिग्ज’, ८९६ बॅनर, १८८ कायमस्वरुपी फलक आणि २८३ झेंडे जप्त केले.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईपर्यंत शहराच्या विद्रुपीकरणास कारक ठरलेल्या राजकीय पक्षांच्या फलकांकडे पालिकेने कानाडोळा करण्याची भूमिका ठेवली होती. उच्च न्यायालयाने निर्देश दिल्यानंतरही शहर फलकमुक्त होऊ शकले नाही. राजकीय दबावामुळे आजवर कचखाऊ भूमिका घेणारा पालिकेचा अतिक्रमण विरोधी विभाग आचारसंहिता लागू झाल्यानंतर झोपेतून जागा झाला. प्रमुख रस्ते व चौकात झळकणारे राजकीय पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे सर्व प्रकारचे फलक जमा करण्याची मोहीम हाती घेण्यात आली. गुरूवारी नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, नाशिकरोड, नवीन नाशिक व सातपूर विभाग अशा सर्व भागातून एकूण ४३ होर्डिग्ज, ८९६ बॅनर, १८८ कायमस्वरुपी फलक आणि २८३ झेंडे जप्त करण्यात आले. शहरातील वेगवेगळ्या भागात राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभारलेले फलक हटविले जाऊ लागल्याने अनेक रस्ते व चौक मोकळा श्वास घेऊ लागले आहेत. नाशिकप्रमाणे मालेगाव, धुळे, जळगाव व नंदुरबार भागातही आचारसंहितेचा असा परिणाम पहावयास मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा