कोकणचा हापूस आंबा खवैय्यांच्या भेटीला येण्यास अद्याप काही महिन्यांचा वेळ असला तरी केरळचा लालबाग आंबा नववर्षांच्या पूवसंध्येलाच बाजारात आला आहे. त्याचे भावही आवाक्यात असल्याने सामान्यांना थंडीच्या महिन्यातही त्याची चव चाखता येवू शकेल.
थंडी कमी झाली की कोकणचा हापूस बाजारात येतो. मार्च ते मे महिन्यात हापूसबरोबरच कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू व गुजरात या राज्यातील हापूस, तोतापुरी, निलम, पायरी, केशर, काळा पहाड, सुंदरी, मलगोबा, रत्ना, सरदार, बदामी हा आंबा ग्राहकांच्या स्वादासाठी उपलब्ध असतो. तर ऑगस्ट-सप्टेंबर दरम्यान उत्तर प्रदेश व पंजाबातील दशेरा, लंगडा, फजली, चौसा या आंब्याच्या जाती उपलब्ध असतात. केरळमधील हवामान उष्ण व दमट आहे. तेथे आंब्याचा हंगाम डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. पिय, पायरी, हापूस, बेनेशा व लालबाग या जातींचा आंबा खवैय्यांच्या भेटीला येतो. राज्यात केरळच्या लालबाग आंब्याला मागणी असते.
यंदा केरळ राज्यात आंब्याचे उत्पादन बऱ्यापैकी आहे. त्यामुळे भावही ग्राहकांना परवडतील असेच आहेत. शहरातील घाऊक आंबा विक्रेते बशीर बागवान यांच्याकडे लालबाग विक्रीला आला आहे. घाऊक विक्रीचा दर ७० ते ८० रुपये किलो असला तरी ग्राहकांना तो सव्वाशे रुपयांपर्यंत मिळत आहे. सध्या लग्नसराई थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे आंब्याला मागणीही कमी असल्याचे बागवान यांनी सांगितले.
पूर्वीच्या काळी विशिष्ट हंगामात विशिष्ट फळे विक्रीसाठी बाजारात येत. पण आता शीतगृहांमुळे फळे केव्हाही मिळतात. जागतिकीकरणामुळे परदेशातील फळेही अगदी ग्रामीण भागातदेखील उपलब्ध होतात. टरबूज, सफरचंद व आंबा कुठल्याही मोसमात मिळतो. त्याला खवैय्यांचीही मागणी असते. डाळिंब व द्राक्षाचे दर पंजाब बिहार व उत्तर प्रदेशातील थंडीमुळे कमी आहेत. उन्हाळ्यात मात्र भावात वाढ होईल, असे बागवान यांनी सांगितले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा