जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने जनजीवन गोठवून टाकले असून कमालीच्या गारठय़ाने आज पहाटे नीचांकी तापमानाची नोंद झाली. तब्बल ५.६ एवढय़ा तापमानाची नोंद मराठवाडा कृषी विद्यापीठातील वेधशाळेत करण्यात आली. या वर्षीचे हे सर्वात कमी तापमान नोंदवण्यात आले. थंडीचा जोर अजूनही कायम असून भर दुपारीही थंडीचे अस्तित्व जाणवत आहे.
यंदा हिवाळा सुरू झाल्यानंतर बरेच दिवस थंडीचे अस्तित्व जाणवले नाही. गेल्या काही दिवसांत थंडीने आपले अस्तित्व दाखवायला प्रारंभ केला. नोव्हेंबरच्या शेवटी बोचऱ्या थंडीचा कडाका जाणवला होता. त्या वेळी परभणी जिल्ह्य़ातील तापमान ९.९ वर नोंदवले होते. राज्यात सर्वाधिक कमी तापमानाची त्या वेळी नोंद झाली होती. या थंडीनंतर मागील महिन्याभरापासून पुन्हा थंडी गायब झाली होती. मात्र सोमवारपासून कडाक्याच्या थंडीचे पुनरागमन झाले. भल्या पहाटे फिरायला जाणाऱ्यांची संख्या यामुळे रोडावली आहे.
भरदुपारी उन्हाची तीव्रता सुखावून जाऊ लागली आहे. थंडी अधिक असल्याने सायंकाळी दुकाने लवकर बंद होत आहेत. तसेच रात्री आठनंतर रस्यावरही सामसूम असते.
औरंगाबादतेही थंडीचा कडाका
गेल्या दोन दिवसांपासून औरंगाबादेतील तापमान कमालीचे घसरले आहे. गुरुवारी ९.६ अंश सेल्सियसपर्यंत पारा खाली घसरला. आणखी काही दिवस थंडीचा कडाका राहील, असे हवामान विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
सकाळी जोराचा वारा असल्याने शाळेतील मुलांना आणि वयोवृद्धांना थंडी त्रासदायक ठरू लागली आहे. शहरातही सकाळी शेकोटी पेटविली जाते. विशेषत: विद्यार्थी आणि पहाटे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांनी जागोजागी शेकोटय़ा पेटविल्या. दिवसभर गरम कपडे घालूनच दैनंदिन व्यवहार केले जात होते.
गारठा कमालीचा वाढला !
जिल्ह्य़ात गेल्या दोन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीने जनजीवन गोठवून टाकले असून कमालीच्या गारठय़ाने आज पहाटे नीचांकी तापमानाची नोंद झाली. तब्बल ५.६ एवढय़ा तापमानाची नोंद मराठवाडा कृषी विद्यापीठातील वेधशाळेत करण्यात आली.
First published on: 28-12-2012 at 04:52 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold increased on the top