विदर्भात सध्या थंडीचा प्रकोप सुरू असला तरी ही थंडी रब्बी हंगामातील गहू व हरभरा पिकांना पोषक ठरत आहे. थंडीमुळे खरिपाच्या पिकांचेही काही नुकसान झाल्याचे आढळून आले नाही. ओंब्या धरण्याच्या अवस्थेत असलेल्या गव्हाला आणि फुले व घाटे धरण्याच्या अवस्थेतील हरभरा पिकाला थंडी फायदेशीर ठरत आहे. कडाक्याच्या थंडीमुळे हरभऱ्यावरील घाटे अळी नियंत्रणात येत आहे. नागपूर विभागात यावर्षी रब्बी हंगामात हरभरा पिकाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. सूर्यफूल, जवस व ज्वारी पिकाचे क्षेत्र मात्र घटले असून गव्हाने सरासरी कायम राखली आहे. विभागात रब्बी पिकांची शंभर टक्के पेरणी आटोपली असून हंगामाच्या सुरुवातीलाच पेरणी झालेल्या हरभरा पिकावर मर रोगाचा तर खरिपातील तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
विभागात रब्बीचे पिकाचे पेरणी क्षेत्र ४ लाख, ५ हजार २०० हेक्टर आहे. यामध्ये हरभरा पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख, २१ हजार हेक्टर आहे. पण यावर्षी या क्षेत्रात वाढ झाली असून १लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रात (१३३ टक्के) पेरणी झाली आहे. या उलट परिस्थिती ज्वारी पिकाची झाली. ज्वारीची केवळ ३४ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. १ लाख १७ हजार हेक्टरमध्ये गव्हाची पेरणी झाली आहे.
विभागात वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्य़ांमध्ये  दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. नागपूर, भंडारा व वर्धा जिल्ह्य़ांत रब्बी हंगामात सुरुवातीलाच पेरणी झालेल्या हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. पिकांवरील किडीच्या प्रादुर्भावमुळे शेतक ऱ्यांचे नुकसान होत आहे.
विभागात धान पिकाची कापणी आटोपली असून मळणीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी कापसाच्या तिसऱ्या वेचणीचे काम सुरू झाले आहे. पीक सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पांतर्गत कृषी विभाग शेतकऱ्यांना कीड नियंत्रणाबाबत मार्गदर्शन करीत असल्याचे विभागीय कृषी सहसंचालकांनी पीक परिस्थितीच्या अहवालात नमूद केले आहे.