काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पवार यांचे चिरंजीव, माजी नगराध्यक्ष अॅड. लक्ष्मण पवार यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बदामराव पंडित व विधान परिषदेचे सदस्य अमरसिंह पंडित या कट्टर विरोधी काका-पुतण्याच्या गटात मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
गेवराई मतदारसंघात भाजपला दोन्ही पंडितांच्या विरोधात सक्षम पर्याय मिळाल्याने नवीन राजकीय समीकरणे तयार होतील, असे आडाखे बांधले जात आहेत. तसेच शिवाजीराव पंडित यांच्याशी नातेसंबंध व राजकीय पातळीवर आपले कौशल्य पवार यांना पणाला लावावे लागेल, याचीही चर्चा आहे. गेवराई मतदारसंघात माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांनी सलग ४० वर्षे वर्चस्व राखले. काही वर्षांपूर्वी त्यांचे सख्खे चुलत बंधू बदामराव पंडित यांनी बंड करून भाजपच्या पाठिंब्यावर दोन वेळा विजय मिळविला. त्यानंतर शिवाजीराव यांचे चिरंजीव अमरसिंह यांनी थेट भाजपात प्रवेश करून बदामराव यांचा पराभव केला. मात्र, मागील खेपेला पुन्हा बदामराव यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर अमरसिंह यांचा पराभव केला.
अमरसिंह यांच्याकडे तालुकाभर सहकारी व शिक्षण संस्थांचे जाळे आहे. बदामराव यांच्याकडे गावपातळीपर्यंत कार्यकर्त्यांची मजबूत फळी आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत काका-पुतण्यातील संघर्ष कायम चर्चेत राहिला. पंडित यांच्या विरोधात तिसरा राजकीय पर्याय देण्याचा अनेक पक्षांनी प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. राज्य व जिल्हास्तरावर बदलत्या राजकीय स्थितीत मागील वर्षी अमरसिंह पंडित यांनीच थेट राष्ट्रवादीत प्रवेश केला. जिल्हा परिषदेत ४ सदस्यांचे मत राष्ट्रवादीला मिळाल्याने सत्ता कायम राहिली व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अमरसिंह यांना विधान परिषद आमदारकीचे बक्षीस दिले.
दोन कट्टर काका-पुतण्याला एका पक्षात ठेवण्याचा प्रयोग अजित पवार यांनी केला. परंतु तेव्हापासून भविष्यात आमदारकीची उमेदवारी कोणाला, या बाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी अमरसिंह यांच्या अजित पवार यांच्याशी वाढत्या जवळिकीमुळे बदामराव भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. दोन्ही पंडित राष्ट्रवादीत गेल्याने भाजपच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे दोन्ही पंडितांना पर्याय ठरेल, अशा नेतृत्वाचा शोध भाजप नेते घेत होते.
काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पवार यांचे चिरंजीव बाळराजे एका गुन्ह्य़ात शिक्षा भोगत असून, दुसरे चिरंजीव अॅड. लक्ष्मण सक्रिय राजकारणात आहेत. गेवराईत विकास आघाडीच्या झेंडय़ाखाली पवार बंधूंनी नगर परिषदेत एक हाती सत्ता मिळविली. दोन्ही पंडितांनंतर तालुक्यात पवार यांना मानणारा वर्ग मोठा आहे. पण शिवाजीराव पंडित यांचा मुलगा जयसिंह यांच्याशी पवार यांच्या मुलीचा विवाह झाल्याने पवार बंधूंची अमरसिंह यांच्याशी जवळीक आहे. मागील काही वर्षांपासून माधवराव पवार मुलांच्या राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्नशील होते. काँग्रेस पक्षात राहून भविष्य नाही. त्यात अमरसिंह यांनी भाजप सोडल्याने भाजपलाही गरज निर्माण झाली होती. त्यामुळे बाळराजे व लक्ष्मण पवार यांनी तालुक्यातील ८५ गावांचा दौरा केला.
बहुतांशी गावांतून भाजपात जाण्याबाबत सूचना आल्याने पवार बंधूंनी अखेर खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याशी चर्चा करून भाजपात प्रवेश केला. नगरपालिकेसह तालुक्यातील २५ ग्रामपंचायती पवार यांच्याकडे आहेत. दोन्ही पंडितांवर नाराज असलेला मतदार आपल्याकडे वळण्याची पवार यांना आशा शक्यता आहे. त्यामुळे पंडितांविरुद्ध भाजपला सक्षम नेतृत्व मिळाल्याचे मानले जाते.
गेवराईत पंडित काका-पुतण्याच्या गटात अस्वस्थता
काँग्रेसचे माजी आमदार माधवराव पवार यांचे चिरंजीव, माजी नगराध्यक्ष अॅड. लक्ष्मण पवार यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बदामराव पंडित व विधान परिषदेचे सदस्य अमरसिंह पंडित या कट्टर विरोधी काका-पुतण्याच्या गटात मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
आणखी वाचा
First published on: 08-05-2013 at 02:38 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold war between badamrao pandit and amar singh pandit