सोलापूरच्या राजकीय आखाडय़ात एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देणाऱ्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे व सिटूचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्यात सुरू असलेले शीतयुध्द पुन्हा उफाळून आल्याचे पाहावयास मिळाले. विशेषत: या राजकीय साठमारीमध्ये कामगारांची शक्ती आपापल्या बाजूने उभी करण्यासाठी शिंदे व आडम हे दोघे ताकद पणास लावून प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.
केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणाच्या विरोधात ४८ तासांच्या देशव्यापी बंदमध्ये कामगारांचा सहभाग वाढविण्यासाठी सिटूचे नेते आडम मास्तर यांनी गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार तयारी चालविली होती. यानिमित्ताने होम मैदानावर कामगारांचा महापडाव अभियान यशस्वी करण्याचा त्यांचा निर्धार होता. या आंदोलनात एक लाखापेक्षा अधिक यंत्रमाग व विडी कामगारांचे एकत्र शक्तिप्रदर्शन करण्याचा संकल्प आडम मास्तर यांनी सोडला होता.
तथापि, आडम मास्तर व त्यांची फौज महापडाव अभियानाच्या यशस्वीतेसाठी कामाला लागली असतानाच दुसरीकडे आडम मास्तर यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कामगार व कर्मचाऱ्यांच्या बंद आंदोलनाच्या पहिल्या दिवशी वालचंद महाविद्यालयासमोरील चिप्पा मार्केटमध्ये कामगारांचे दोन दिवसीय शिबिर आयोजिले होते. त्यासाठी भव्य शामियाना उभारण्यात आला होता. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कामगारांना या शिबिराच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा प्रयत्न आमदार प्रणिती शिंदे यांनी केला. भारतीय यंत्रमाग कामगार संघटना व जयहिंद श्रमिक कामगार संघटना यांच्या संयोजनाखाली आयोजिलेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार शिंदे यांच्या हस्ते झाले. या शिबिरात सुमारे चार हजारांपेक्षा जास्त कामगारांनी सहभाग नोंदविला होता.
या शिबिरात रेशनकार्ड, आधारकार्ड नोंदणी, रेल्वे इज्जत पास, विवाह नोंदणी, जनश्री विमा योजना, मतदार ओळखपत्र, राजीव गांधी आरोग्य विमा योजना, घरकुल आदी विविध शासकीय योजनांचा लाभ कामगारांना मिळवून देण्याचा संकल्प आमदार प्रणिती शिंदे यांनी सोडला. त्यासाठी सर्व कामगारांनी आपणास साथ देण्याची हाक त्यांनी दिली.
मागील विधानसभा निवडणुकीत शहर मध्य मतदारसंघात नरसय्या आडम मास्तर यांना केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांनी पराभूत केले होते. परंतु आडम मास्तर यांनी पराभवाने खचून न जाता पुन्हा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आडम यांचे आमदार प्रणिती शिंदे यांना जोरदार आव्हान राहणार असल्याची अपेक्षा आहे. या पाश्र्वभूमवीर या दोघा नेत्यांमध्ये साठमारीचे राजकारण सुरू असल्याने हा स्थानिक राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे.

Story img Loader