वर्धा लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस नेत्या चारुलता टोकस यांनी प्रथमच जाहीरपणे दावा करताना पक्षनिष्ठेचा मुद्दा मांडत दत्ता मेघे गटावर शरसंधान केल्याने वर्धेतील राजकीय शत्रुत्वाची परंपरा ऐन निवडणुकीत पुन्हा उसळणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसतर्फे सागर मेघे आणि अ.भा. काँग्रेस समितीच्या सदस्य चारुलता टोकस यांच्यात आतापासूनच चुरस सुरू झाली आहे. मेघे गटाने सागर मेघेंच्या उमेदवारीचा दावा वर्षभरापासून लावून धरला आहे. मात्र, टोकस यांच्या नावाची केवळ चर्चाच होती. त्यांनी स्वत: उमेदवारीबाबत मत मांडले नव्हते. दिल्लीतील वास्तव्य सोडून वर्धा मतदारसंघात त्यांनी अलीकडच्या काही महिन्यांपासून विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा सपाटा सुरू केला आहे.
वर्धा जिल्हा काँग्रेस समितीच्या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना टोकस यांनी उमेदवारीचा पहिल्यांदाच दावा केला. त्या म्हणाल्या, आई- वडील (प्रभाराव-आनंदराव) राजकारणात सक्रिय होते, तेव्हापासूनच काँग्रेस पक्षाचे काम करीत आहे. आगामी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अनेक इच्छुकांपैकी मीसुध्दा एक असून श्रेष्ठींच्या परवानगीनंतरच निवडणूक लढेन. उमेदवारी मिळाली नाही तरी ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम करेल. कारण मी पक्षाची आजीवन निष्ठावंत आहे, म्हणून निष्ठावंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा, त्याला सन्मान देत कार्य करण्याचा व समस्या सोडविण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. टोकस यांचे भाषण म्हणजे मेघे गटावर अप्रत्यक्ष शरसंधान समजले जात आहे. मेघेविरोधी रणजीत कांबळेंच्या भगिनी असलेल्या टोकस यांना कांबळे गटाच्याच ताब्यात असणाऱ्या जिल्हा काँग्रेस समितीने पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या प्रभागनिहाय दौऱ्याचे नेतृत्व यावेळी एका ठरावाद्वारे बहाल करण्यात आल्याने त्यांच्या उमेदवारीच्या दाव्याला बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले आहे.

Story img Loader