ढगाळ वातावरणाचे मळभ दाटल्याने नववर्षांच्या सुरुवातीला थंडी गुल झाल्याचे जाणवत असले तरी जसजसे आकाश निरभ्र होत जाईल, तसतसा वातावरणात गारवा निर्माण होणार आहे. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये तापमान उणे अंशाच्या खाली गेले असून सर्वत्र बर्फाचे आच्छादन आहे. उत्तरेकडे सुरू असलेल्या बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर महाराष्ट्रावर होणार असून बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने साडे सहा अंशापर्यंत घसरलेले तापमान सध्या १३.५ अंशावर पोहोचले आहे. नववर्षांचे स्वागत या वातावरणात होत असले तरी पुढील काही दिवसात हुडहुडी भरविणाऱ्या थंडीचे पुनरागमन होईल, असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. मालेगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यात थोडय़ा-फार फरकाने अशीच स्थिती आहे.
उत्तर महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये सुरूवातीला आलेली थंडिची लाट महिन्याच्या अखेरीस काहिशी ओसरली आहे. काही दिवस गुलाबी थंडिचा आस्वाद घेणाऱ्या उत्तर महाराष्ट्रात नववर्षांत नेमके कसे चित्र राहणार याबद्दल सर्वाना उत्सुकता आहे. मागील पंधरा दिवसात ढगाळ वातावरणाने थंडीचा कडाका बराच कमी केला. नाशिकमध्ये १५ डिसेंबर रोजी ६.५ अंश इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. पुढील काही दिवस तापमान सात ते दहा अंशापर्यंत स्थिरावले होते. यामुळे शहरवासीयांना सुखद धक्का बसला. परंतु, त्यानंतर वातावरणात पुन्हा बदल झाले. म्हणजे पंधरा दिवसात तापमानात सहा ते सात अंशांनी वाढ झाली. मंगळवारी १३.५ अंश तापमान नोंदले गेले.
ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ झाल्याचे हवामानशास्त्र विभागाने म्हटले आहे. नवीन वर्षांचे स्वागत करताना गारव्याचा आधीसारखा प्रभाव जाणवला नाही. उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्राच्या तापमानावर होतो आणि त्यामुळे थंडिची लाट येते, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. सध्या त्या भागात बर्फवृष्टी होत असून तापमान उणे अंशात गेले आहे. त्या भागातून वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्राचे तापमान कमी होते. सध्या वाऱ्याची दिशा तिच असली तरी वेग संथ आहे. वाऱ्याचा वेग वाढल्यास आणि आकाश निरभ्र झाल्यास तापमान झपाटय़ाने खाली जाईल, असेही या विभागाने सूचित केले आहे. या पाश्र्वभूमीवर, नवीन वर्षांत थंडिची आणखी लाट अनुभवण्यास मिळू शकते.
नाशिकप्रमाणे मालेगाव, धुळे व नंदुरबार भागात कमी-अधिक प्रमाणात ही स्थिती असल्याने वातावरणातील गारवा काहिसा कमी आहे. जळगावमध्येही ढगाळ वातावरणामुळे तितकासा गारवा जाणवला नाही. नववर्षांचे स्वागत या वातावरणात होत असले तरी पुढील काळात उत्तर महाराष्ट्रात थंडिची लाट येईल असे हवामानशास्त्र विभागाचे म्हणणे आहे.
हंगामातील नीचांकी तापमान अद्याप बाकी ?
गेल्या काही वर्षांतील नीचांकी तापमानाच्या नोंदी पाहिल्यास जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये प्रामुख्याने ही नोंद झाल्याचे स्पष्ट होते. यंदाच्या हंगामात आतापर्यंत ६.५ या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. मागील काही वर्षांतील नोंदी पाहिल्यास हंगामातील ही पातळी आणखी खाली जावू शकते असे लक्षात येईल. मागील हंगामात म्हणजे ६ जानेवारी २०१३ रोजी ४.४ अंश या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. २०१२ मध्ये ९ फेब्रुवारीला २.७ अंश तापमानाची नोंद झाली. २०११ मध्येही ७ जानेवारी रोजी हंगामातील नीचांकी ४.४ अंशांची नोंद झाल्याची माहिती हवामानशास्त्र विभागाने दिली. मागील तीन हंगामातील आकडेवारी लक्षात घेतल्यास जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात तापमान सर्वात कमी होत असल्याचे लक्षात येते. यंदा डिसेंबरच्या मध्यावर ६.५ अंश तापमान घसरले असले तरी जानेवारी अथवा फेब्रुवारीमध्ये ते त्यापेक्षा खाली जाऊ शकते, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
नाशिकमध्ये थंडीचा कडाका चांगलाच जाणवत असला तरी दवबिंदू गोठण्याइतपत परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. परंतु निवडुंग वर्गीय या वनस्पतीला लपेटलेल्या जाळ्यामुळे तसा आभास होणे साहजिक आहे.    

Story img Loader