दिवाळी आटोपताच विदर्भात थंडीने जोर पकडला आहे. सकाळी आणि सायंकाळच्यावेळी थंडी वाढल्याने अनेक लोक उबदार कपडे परिधान करून बाहेर पडत आहेत. विदर्भात अमरावती आणि गोंदिया शहरात सर्वात कमी म्हणजे किमान १२ व कमाल २८.४ अंश सेल्सिअस तर नागपूर शहरात किमान १३.३ तर कमाल २९.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. गेल्या दोन दिवसापासून पारा खाली सरकत असल्याने थंडी वाढली आहे.
यावर्षी विदर्भासह राज्यात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता बघता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापासून थंडी जाणवायला लागली आहे. विदर्भात अकोल्यामध्ये १५.५, बुलढाणा १६, ब्रम्हपुरी १५.७, चंद्रपूर १६, गोंदिया १२, वाशीम १२.५, वर्धा १३.९ तर यवतमाळात १३.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे. दिवाळीनंतर अचानक झालेल्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, पडसे, ताप आदी आजारांच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. शहर व परिसरात सकाळी आणि सायंकाळच्यावेळी थंडी पडू लागली आहे.
वाढत्या थंडीमुळे अडगळीत पडलेले स्वेटर, मफलर, टोपी, जॅकेट तसेच वुलन पांघरून बाहेर काढण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी तापमान बरेच खाली येत असल्याने फिरायला बाहेर पडणारी मंडळी थंडीपासून बचाव करणाऱ्या साहित्यानिशी निघत आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ाच शहराचे तापमान १५ ते १६ अंशांपर्यंत होते. यावेळी १२ अंशापर्यंत घसरले आहे. विदर्भात  काही दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.  
थंडीने लहान मुले व ज्येष्ठ नागरिक अस्वस्थ झाले असून उबदार कपडय़ांचा वापर वाढला आहे. अनेकजण सकाळी शेकोटी पेटवून आणि उन्हाचा आसरा घेत थंडीचा कडाका कमी करताना दिसत आहेत.

Story img Loader