तमिळनाडूत धडकलेले मडी वादळ समुद्रातच विसावल्याने उत्तरेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचा प्रभाव संपूर्ण राज्यात जाणवत आहे. परिणामी मराठवाडय़ात सर्वत्र कडाक्याची थंडी पसरली आहे.
राज्यातही थंडीचा कडाका चांगलाच जाणवत आहे. नांदेडच्या तापमानातही लक्षणीय घट होऊन ८.०५ सेल्सिअस अंश नोंदले गेले. यंदा जिल्ह्यात बऱ्यापकी पाऊस झाला. त्यामुळे थंडीची तीव्रता जाणवेल, अशी शक्यता होतीच. परंतु अंदाजाप्रमाणे जास्त थंडीचा प्रभाव जाणवत असल्याने रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. ताप, सर्दी, खोकला यांसारख्या आजारांचा फैलाव झाला आहे. शासकीय रुग्णालयासह बहुतांश खासगी रुग्णालयेही तुडुंब भरली आहेत. आजारांचा त्रास प्रामुख्याने लहान मुलांना होत आहे. थंडीची तीव्रता लक्षात घेऊन जनतेने आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. उबदार कपडे वापरावेत, सांधे उघडे असू नयेत, थंड पाण्याचा वापर टाळावा. आजारावर खासगी उपचार घेण्यापेक्षा तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन केले आहे. वास्तविक, हिवाळा आरोग्यासाठी उत्तम मानला जात असला, तरी वातावरणात गारवा असल्याने आजारांचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
थंडीची तीव्रता वाढल्याने उबदार कपडय़ांची मागणीही वाढली आहे. स्वेटर, मफलरच्या विक्रीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. कलामंदिर, जुना मोंढा भागातल्या बाजारपेठा फुलल्या आहेत. उबदार कपडे विक्रेत्यांनी आणखी मागणी वाढणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन राजस्थान, जम्मू-काश्मीर आदी भागातून कपडे मागवले आहेत.

Story img Loader