चांदणी चौकातून पौड रस्त्याच्या दिशेने विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या स्कूल बसने उतारावर ब्रेक न लागल्यामुळे दुचाकीवरील तरूणाला पाठीमागून जोरदार धडक दिली. स्कूल बस आणि पुढील बाजूस असलेल्या ट्रकमध्ये ही दुचाकी दबून विद्यार्थ्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे चांदणी चौकात बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.
रजत सुरेंद्र कुलकर्णी (वय २७, रा. बावधन) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. याप्रकरणी स्कूल बसचालकावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजत हा गरवारे महाविद्यालयात अकरावीमध्ये शिकत होता. सकाळी सातच्या सुमारास तो दुचाकीवरून कोथरूडकडे निघाला होता. चांदणी चौकाकडून तो उतारावरून जात होता. त्याच्या पुढे सिंमेटचे ब्लॉक भरलेला ट्रक होता. या ट्रकच्या पाठीमागे रजत हा हळूहळू दुचाकीवरून जात होता. त्या वेळी रजतच्या पाठीमागे एक स्कूलबस येत होती. तीव्र उतार असल्यामुळे स्कूलबसचे ब्रेक न लागल्यामुळे ती थेट रजतच्या दुचाकीला जाऊन धडकली आणि तशीच पुढे जात ट्रकवरही जाऊन आदळली. या दोन मोटारींच्यामध्ये रजतची दुचाकी अडकून तो गंभीर जखमी झाला. जखमी स्थितीत रजतला उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी स्कूलबसचा चालक संतोष बाबूराव नलावडे (वय ३५, रा. भूगाव) याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयटी शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन ही बस निघाली होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये मुले होती. या अपघातामध्ये विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या असून त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. बसचालक व दुसऱ्या एका दुचाकीवरील तरूण ओंकाळ दुधाळ हेही या अपघातामध्ये जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती कोथरूड पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक एस. बी. नवले हे अधिक तपास करत आहेत.

Story img Loader