सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय एकता ट्रस्टच्या माध्यमातून गुजरात येथील नर्मदा नदीच्या तीरावर उभारल्या जाणाऱ्या सरदार पटेल यांच्या पुतळ्यासाठी सातारा जिल्ह्यातून लोह व मातीचे संकलन दि. १६ पासून सुरू होणार आहे, अशी माहिती लोह संकलन समितीचे अध्यक्ष दत्ताजी थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दत्ताजी थोरात पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात दि. १६ ते २१ फेब्रुवारीपर्यंत रथयात्रेचे आयोजन केले असून लोह आणि माती जमवण्याचे अभियान १५ मार्चपर्यंत आम्ही पूर्ण करणार आहोत. जिल्ह्यात सुमारे १५०० ग्रामपंचायती व वाडय़ावस्त्या असून येथील ग्रामस्थांच्या वतीने ही संकलन प्रक्रिया निर्धारित वेळेत आम्ही पूर्ण करणार आहोत. १६ तारखेला सकाळी ८ वाजता राजवाडा येथील अजिंक्य गणेश मंदिरापासून हे अभियान सुरू होणार आहे. ग्रामपंचायतींनंतर नगरपालिका तसेच मोठय़ा गावातून हे अभियान राबवले जाईल, असे थोरात यांनी सांगितले. या प्रसंगी माजी नगरसेवक किशोर गोडबोले, अॅड. विजय काटवटे, भाजपचे पदाधिकारी पोरे उपस्थित होते.

Story img Loader