वीजबिलांच्या थकबाकीच्या वसुलीसाठी ‘महावितरण’च्या पुणे परिमंडलात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत दोन आठवडय़ांमध्ये ५५ हजार ५०२ थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली. त्यातील ४४ हजार ९८३ थकबाकीदारांनी थकबाकी भरल्याने ‘महावितरण’च्या तिजोरीत तब्बल १६ कोटी ८४ लाख रुपये जमा झाले आहेत. थकबाकी भरलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.  
 पुणे परिमंडलमध्ये पुणे, िपपरी-चिंचवड शहरांसह राजगुरुनगर, मंचर व मुळशी विभागात वीजबिलांच्या थकबाकीसाठी वसुलीची मोहीम सध्या सुरू आहे. मुख्य अभियंता सिद्धार्थ नागटिळक यांच्यासह परिमंडलातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंता हेही या मोहिमेत सहभागी झाले आहेत. ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे. मागील दोन आठवडय़ांमध्ये पुणे परिमंडलात २३ कोटी ३२ लाख रुपयांच्या थकीत वीजबिलांपोटी ५५ हजार ५०२ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यापैकी ४४ हजार ९२९ ग्राहकांनी कारवाईनंतर वीजबिलांचा भरणा केला.
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित व पूर्ववत करताना मीटर रीडिंग घेण्यात येते. त्याची नोंद थेट ‘महावितरण’च्या माहिती-तंत्रज्ञान विभागात करण्यात येते. त्यामुळे थकबाकी असताना संबंधित ग्राहकाचा वीजपुरवठा परस्पर सुरू करण्याचे प्रयत्न उघडकीस येणार आहेत. ग्राहकाने इतर ठिकाणाहून वीज घेतल्यास त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले. थकबाकीदार वीजग्राहकांनी तातडीने वीजबिलांचा भरणा करून होणारी कारवाई टाळावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.    

Story img Loader