जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची प्रभारी सूत्रे जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. किमान महिनाभर तरी संजीवकुमार यांच्याकडेच हा कार्यभार राहील.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील यांची ठाणे जि.प.त बदली झाल्याने सीईओपदाची सूत्रे जिल्हाधिका-यांकडे सोपवण्यात आली आहेत. पाटील यांच्या जागी अद्यापि कोणाची नियुक्ती झालेली नाही. या पदावर तातडीने नियुक्ती होण्यासाठी अधिका-यांना पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी पाटील आज कार्यमुक्त झाले. सीईओ रुबल अग्रवाल ३४ दिवसांच्या प्रदीर्घ रजेवर आहेत, त्या सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे गेल्या आठवडय़ापासून सीईओ पदाची सूत्रे पाटील यांच्याकडेच होती. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालकपदही अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाचेच आहे, परंतु हे पदही सध्या प्रभारीच आहे व पदाची सूत्रे गेल्या काही महिन्यांपासून सहायक प्रकल्प संचालक डॉ. वसंत गारुडकर यांच्याकडे आहे. आता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
जि. प.च्या टंचाई उपाययोजनांसाठी बोलावलेल्या विशेष सभांना महसूल अधिकारी अनुपस्थित राहिले, त्यातून जि.प. व महसूल या दोन यंत्रणांत वादंग निर्माण झाले होते. या पाश्र्वभूमीवर सीईओपदाची सूत्रे जिल्हाधिका-यांकडे जाण्याची घटना लक्षणीय मानली जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा