कराड नगरपालिकेतर्फे रस्ता दुभाजक विकसित करून जाहिरातीचे फलक लावण्याच्या निविदेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधी आघाडीने केला होता. याबाबत जिल्हाधिका-यांकडे केलेल्या तक्रारीवरून संबंधित निविदेला स्थगिती दिली असल्याची माहिती विरोधी जनशक्ती आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर व स्मिता हुलवान यांनी पत्रकार बठकीत दिली. नगरसेविका शारदाताई जाधव, सुरेखा पालकर, विक्रम पावसकर, श्रीकांत मुळे, बाळासाहेब यादव, महादेव पवार, बाळासाहेब आलेकरी आदी उपस्थित होते.
हुलवान म्हणाल्या, की यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनापासून कृष्णा नाक्यापर्यंत रस्ता दुभाजक विकसित करून जाहिरातीचे फलक लावण्याच्या निविदेत भ्रष्टाचार झाला आहे. ३ जानेवारी २०१३ रोजी दुभाजकातील जाहिरातीच्या फलकांबाबत निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्याबाबत दि. १२ फेब्रुवारी रोजी झालेली स्थायी समितीची सभा कोणत्याही उचित कारणाशिवाय तहकूब केली. त्यानंतर दि. १२ जून रोजी फेरनिविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. त्या वेळी भाविक अ‍ॅडव्हर्टायझिंग, श्री अ‍ॅडस, शाईन अ‍ॅडव्हर्टायझिंग यांच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. फेरनिविदानुसार भाविक अ‍ॅड कंपनीला जाहिरात फलक लावण्यासाठी प्रत्येक वर्षी १०० रुपये प्रतिफलक इतके नगरपालिकेला द्यावे लागणार आहेत. वास्तविक सभा तहकूब झाली त्या वेळी हाच दर तब्बल ७ हजार ५०० रुपये प्रतिफलक इतका होता. या दोन्ही दरांतील तफावत पाहता नगरपालिकेचे ७ हजार ४०० रुपये प्रतिफलक  इतके नुकसान झाले. भाविक अ‍ॅड कंपनीने मागील निविदेत हाच दर फक्त १०० रुपये दिला आहे. निविदेची मुदत ३ वर्षे असताना भाविक अ‍ॅड कंपनीला जाहिरातीचे अधिकार ९ वर्षांसाठी देऊन नियमांची पायमल्ली करण्यात आली आहे. त्यामुळे नगरपालिकेला जुन्या निविदेनुसार ९ वर्षांत ६७ लाख ५० हजार इतके उप्तन्न मिळणार होते, तेच आता फेरनिविदेनुसार फक्त ९० हजार रुपये मिळणार आहेत. त्यामुळे नगरपालिकेला तब्बल ६६ लाख ६० हजार रुपये नुकसान सोसावे लागेल. याबाबत आपण जिल्हाधिका-यांकडे २ ऑगस्ट रोजी रीतसर तक्रार केली होती. त्या तक्रारीत तथ्य असल्यानेच त्यांनी याला सुनावणी होईपर्यंत स्थगिती दिली आहे, तर मुख्याधिका-यांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.