मोठा ‘डामडौल’ असलेल्या ‘मल्हार’, ‘मूड इंडिगो’ यासारख्या महोत्सवांमुळे महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवांचे स्वरूपच गेल्या काही वर्षांत बदलून गेले आहे. आता प्रत्येक महाविद्यालय आपल्या महोत्सवाचा आवाका वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. सेलिब्रिटी, बक्षीसे, नाना इव्हेंटच्या बरोबरीने झालेच तर थोडेफार समाजकार्याचे कोंदणही महोत्सव गाजविण्यासाठी आवश्यक ठरू लागले आहे. हिरीरीने आणि मन झोकून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रूपात या महाविद्यालयांकडे इव्हेन्टसाठी लागणारी ‘मसल पॉवर’ तर मोठी असते. पण, महोत्सवात ‘तामझाम’ दाखविण्यासाठी लागणारी ‘मनी पॉवर’ कुठून आणायची? यासाठी स्थानिक ब्युटी सलूनपासून टोयाटोसारख्या बडय़ा कंपन्यांच्या प्रायोजकांचे मन वळविण्याचे जिकरीचे आणि वेळखाऊ काम आयोजक विद्यार्थ्यांना करावे लागते. त्यातच मंदीमुळे पैशापेक्षाही वस्तू स्वरूपात मदत देण्याकडे प्रायोजकांचा कल असल्याने महोत्सवाचे आर्थिक गणित जुळविताना मोठमोठय़ा महाविद्यालयांनाही तारेवरची कसरत करावी लागते आहे. दिवाळीनंतर ‘उत्सव’, ‘कॅडिलोस्कोप’, ‘डायमेन्शन’, ‘ओ-टू’ या महाविद्यालयीन महोत्सवांच्या धुंदीत मुंबईची तरुणाई न्हाऊन निघते. मल्हार, मूड इंडिगो यासारख्या नावातच मोठा ‘दम’ असलेल्या महोत्सवांसाठी प्रायोजक मिळविणे तितकेसे कठीण नसते. पण, इतर महाविद्यालयांना महोत्सवाची आर्थिक बाजू सांभाळणारे प्रायोजक गाठताना तारेवरची कसरतच करावी लागते. अशावेळी वेगवेगळ्या खासगी कंपन्यांमध्ये मोठय़ा हुद्दय़ावर असलेले माजी विद्यार्थी धावून येतात. पण, ‘मंदीमुळे पैशापेक्षाही वस्तू स्वरूपात मदत देण्याकडे कल जास्त असल्याने प्रायोजकांच्या गळ्यात आपली ‘थीम’ उतरविणे खूप कठीण बनले आहे,’ असे वझे-केळकरच्या ‘डायमेन्शन’च्या आयोजनात सहभागी असलेल्या स्वप्नील शिंदे याने सांगितले.महाविद्यालयीन महोत्सवाच्या आयोजनासाठी १० ते १२ लाख रुपये खर्च सहज येतो. यासाठी लीड, पार्ट, इन्व्हेन्ट, मिडिया, वेन्यू आदी स्वरूपाचे प्रायोजक असतात. लीड प्रायोजक सहज दोन-तीन लाख रुपयांचे प्रायोजकत्व देऊन जातो. यात मोठमोठय़ा खासगी कंपन्यांबरोबरच सध्या बिल्डर लॉबी मोठय़ा प्रमाणावर आहे. काही प्रायोजक हे महोत्सवाचा थोडाफार (पार्ट) खर्च उचलतात. संपूर्ण महोत्सवातील एखाद्या कार्यक्रमाचा खर्च उचलून प्रायोजकत्व देणारेही आहेत. पण, पैशाच्या स्वरूपात मदत देणारे प्रायोजक कमी असल्याने स्टेशनरी, वायरलेस संपर्क यंत्रणा, छपाई, जेवण आदीवर होणारा खर्च कुठून भागवायचा असा प्रश्न असतो. विद्यार्थ्यांना वस्तूच्या स्वरूपात केलेली मदत आधार देऊन जाते. त्यात गिफ्ट व्हाऊचर्स, मंचावर, स्टेशनरी, संगीत व्यवस्थेवर, रोषणाईवर येणारा खर्च, उत्पादनाचे ब्रँडिंग करणारे टीशर्ट आदी स्वरूपात ही मदत केली जाते. एखाद्या ‘फॅशन शो’ किंवा मनोरंजनात्मक कार्यक्रमात कपडे, मेकअप, पादत्राणे आदी वस्तू पुरवूनही प्रायोजकत्व दिले जाते. ब्युटी सलून, फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, ड्रेस, शूज, हेअर डिझायनिंग बुटीक आदी प्रायोजक या प्रकारची मदत करतात. नव्याने बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात असलेले आपले ‘बँड्र’ची किंवा वस्तूची जाहिरात हा या मागील उद्देश असतो, अशी माहिती ‘भवन्स’च्या ‘ओ-टू’ महोत्सवाच्या आयोजनात सहभाग असलेल्या प्रतीक कुलकर्णी याने दिली. तर काही प्रायोजक दर्शनी भागात त्यांची नव्याने बाजारात आलेली मोटरसायकल, स्कूटी, प्रसंगी कारही ठेवण्याच्या बोलीवर मदत करतात. पण, ही मदत पुरेशी होत नाही. कारण, सेलिब्रिटींचे मानधन, येण्याजाण्याचा खर्च, छपाई, स्टेशनरी आदीचा खर्च भागविताना नाकीनऊ येते.
सेलिब्रिटी येती धावूनप्रायोजकत्व स्वीकारताना कंपन्यांचा पहिला सवाल सेलिब्रिटी कोण येणार हा असतो. सेलिब्रिटी मोठा असल्यास प्रायोजकत्व मिळविणे सोपे जाते. काही सेलिब्रिटी पैसे मोजून हजेरी लावतात. अशावेळी महाविद्यालयांचे माजी विद्यार्थी असलेले सेलिब्रिटी धावून येतात. जॉन अब्राहम सारखे विद्यार्थी ‘जयहिंद’च्या महोत्सवाला आवर्जून हजेरी लावताना दिसतात.
वेळही महत्त्वाची
महोत्सवाच्या आयोजनाला फार उशीर होणार नाही, याची काळजीही आयोजकांना घ्यावी लागते. साधारणपणे डिसेंबर-जानेवारी हा महोत्सवांचा काळ समजला जातो. अगदी फारच लवकर म्हणजे सप्टेंबर महिन्यात प्रायोजकत्वासाठी गेल्यास ‘अजून बजेटच ठरलेले नाही,’ अशी कारणे ऐकावी लागतात. आणि उशीर म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गेल्यास आमचे बजेट आता संपून गेले आहे, अशी वाक्ये ऐकावी लागतात. प्रायोजक मिळविण्यात महाविद्यालयांमध्ये असलेल्या स्पर्धेमुळेच महोत्सवाची वेळही सोयीची निवडावी लागते.
‘थीम’ स्मार्ट हवी!
महोत्सवांसाठी प्रायोजकत्त्व मिळविण्याआधी ‘थीम’ निश्चित करायला हवी. ‘थीम’ हुशारीने आणि कल्पकतेने निवडली असल्यास प्रायोजकांकडून लवकर प्रतिसाद मिळतो. पुढचे मार्केटिंगचे डावपेचही त्यावरच ठरतात. मग थीमला अनुसरून आकर्षक माहितीपत्रे छापून घेतली की प्रायोजकांचे मन वळवणे सहज शक्य होते.
मृदुल निळे, ‘विद्यार्थी कल्याण विभागा’चे संचालक