पुणे येथील महाराष्ट्र शैक्षणिक, प्रशासन व व्यवस्थापन, गोखले एज्युकेशन सोसायटी, आणि डॉ. एम. एस. जी. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथील एसएमआरके महिला महाविद्यालयात २ ते ४ नोव्हेंबर या कालावधीत ‘मूल्याधिष्ठीत व गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण-उपाय व व्यवस्थापन’ या विषयावरील परिषदेत वेगवेगळ्या स्तरातील मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. परिषदेचे उद्घाटन कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मीना चंदावरकर यांच्या हस्ते झाले. गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी हे अध्यक्षस्थानी होते. या वेळी, डॉ. चंदावरकर यांना गोपाळ कृष्ण गोखले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून अणूशास्त्रज्ञ डॉ. शंकर गोवारीकर उपस्थित होते.
‘मूल्याधिष्ठीत व गुणवत्तापूर्ण व्यवसाय, उच्च शिक्षणाच्या नव्या दिशा’, ‘मूल्याधिष्ठीत व गुणवत्तापूर्ण तांत्रिक शिक्षण तसेच वैद्यकीय व्यवसायातील नितीमूल्यता’, या विषयांवर आयोजित चर्चासत्र व परिसंवादात वेगवेगळ्या सत्रांमध्ये मान्यवरांनी आपले विचार मांडले. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात डॉ. विनायक गोविलकर यांनी ‘मूल्याधिष्ठित व्यवस्थापकीय शिक्षण’ या विषयावर मार्गदर्शन करतान शिक्षणाचे अंतीम उद्दिष्टय़े म्हणजे व्यक्तीमध्ये ज्ञान, कौशल्ये व नैतिकता बाणवणे असल्याचे सांगितले.
आजची शिक्षण व्यवस्था परीक्षेभोवती केंद्रीत झाली आहे. रिझल्ट ओरीएंटेड झालेली आहे. देशात बरेच कायदेही आहेत, परंतु नुसत्या कायद्याने विकास साधता येत नाही. नैतिकता बाणवल्याशिवाय मूल्यधिष्ठित जीवनप्रणालीत आमूलाग्र बदल होणार नाही. या विषयी त्यांनी यशाची तीन सूत्रे सांगितली. याकरिता समाजाला मूल्याधिष्ठीत करणे गरजेचे आहे. १९८० पासून व्यवस्थापन क्षेत्रात वेगाने वाढ सुरु आहे. कुटुंब व्यवस्थेतून पूर्वी मूल्ये शिकवली जात होती. आता मात्र कुटुंबव्यवस्थाच ढासळली आहे. यावेळी त्यांनी महात्मा गांधींची तत्वाशिवाय राजकारण, कामाशिवाय संपत्ती, सद्सद्विवेकबुध्दी शिवाय आनंद, चारित्र्याशिवाय ज्ञान, नैतिकेशिवाय वाणिज्य, मूल्यांशिवाय शास्त्र, त्यागाशिवाय आराधना या मुल्यांचा दाखला दिला. या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजय गोसावी, तर समन्वयक म्हणून प्रा. डॉ. शेखर जोशी, प्रा. भातांबरेकर होते. यावेळी प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी व डॉ. सरीता औरंगाबादकर यांनी आपले शोधनिबंध सादर केले.
‘मूल्याधिष्ठीत व गुणवत्तापूर्ण व्यवस्थापन शिक्षण, गुणवत्तापूर्ण संशोधन-विचारप्रणाली व अंमलबजावणी’ या विषयावर नामदार गोपाळकृष्ण गोखले स्मृती व्याख्यानामध्ये एनसीएलचे डॉ. अशोक गिरी यांनी विद्याशाखेच्या तीनही क्षेत्रात म्हणजे कला, वाणिज्य व विज्ञान या शाखेत मूलभूत संशोधन कसे करावे, या विषयी माहिती दिली. पारंपरिक काळापासून संसोधन कसे समाजजीवनात रुजले आहे, त्याचे दाखले देताना त्यांनी ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यापासून ते नोबेल पुरस्कार प्राप्त अमर्त्य सेन यांच्या कार्याचा आढावा घेतला. एनसीएलच्या माध्यमातून सुरु असलेल्या मायक्रो बॉयोलॉजी या शाखेतील विविध प्रयोग व संशोधनांची माहिती त्यांनी दिली.
परिषदेच्या समारोपप्रसंगी उच्चशिक्षण सहसंचालक डॉ. नरेंद्र कडू यांनी गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाची गरज व्यक्त केली. देशात २१.४ टक्के उच्च शिक्षणाच्या प्रवाहात असून ३० टक्के जायला हवी. देशातील विद्यार्थी बाहेरच्या विद्यापीठात जातो, ती गुणवत्ता आपल्या देशात यायला हवी, असेही त्यांनी नमूद केले. शिक्षण क्षेत्रात नवीन कायदा येत असल्याची माहिती त्यांनी दिली. तणावमुक्त समाजाची निर्मिती व्हायला हवी असे डॉ. गोसावी यांनी नमूद केले. यावेळी आयोजित ‘सृजन’ या शैक्षणिक प्रदर्शनात ९ महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी तयार केलेले प्रकल्प, संशोधन, यांना हे प्रदर्शन एक व्यासपीठ ठरले. या वेळी स्वयंप्रेरणा, परिवर्तन, एज्युकेअर या विशेषकांसह विद्याश्री या स्मरणिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. महाविद्यालयातील संगीत विभागाच्यावतीने ‘सूरसंगम’ हा सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा